झोंबिवली हा मराठीतला पहिलाच झोंबी सिनेमा असून त्यात ललित प्रभाकर, वैदेही परशुरामी, अमेय वाघ आणि तृप्ती खामकर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. यूडली फिल्म्सची निर्मिती आणि फास्टर फेणे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचे दिग्दर्शन लाभलेला झोंबिवली हा सिनेमा विनोद आणि सामाजिक भाष्य यांची सरमिसळ आहे. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर समीक्षक आणि चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळाले होते. २० मे रोजी हा सिनेमा झी५वर डिजिटल प्रीमियरकरिता सज्ज झाला आहे.
ही कथा सुधीर (अमेय वाघ) या एका मध्यमवर्गीय इंजिनिअरची असून तो त्याची गर्भवती पत्नी, सीमा (वैदेही परशुरामी) सोबत डोंबिवलीतील टोलेजंग इमारतीत राहायला येतो. आपले उर्वरित आयुष्य छान जाईल ही त्याची अपेक्षा असते. तरीच सुरुवातीच्या काळात त्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यानंतर लगेचच जवळच्या जनता नगर वस्तीत झोंबी उद्रेक अनुभवायला मिळतो. हे झोंबी कैक पटीत असतात, टोलेजंग इमारतीमधील लोकांचा भपका पार गळून पडतो. तिथे त्यांच्यासमोर उभे असलेले झोंबी फक्त रक्तपिपासू नसतात, ते अत्यंत हीन खलनायकी प्रवृत्तीचे टोकाचे स्वार्थी आणि अमानुष असतात. सर्वनाशी झोंबी सिनेमाला विनोदाचा तडका असला तरीही ही कलाकृती श्रीमंत-गरीब दरी, बाईचे मायाळू मन, अविचारी शहरी विकास आणि झोपडीत राहणाऱ्यांविषयी समाजात असलेल्या पूर्वग्रहांवर भाष्य करते.