Join us

"आतला कलेचा धागा तुम्हीच विणलेला आहे...", वैभव मांगलेची दिवंगत आजोबांसाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 11:23 IST

Vaibhav Mangale : नुकतेच वैभव मांगलेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने आपल्या आजोबांबद्दल लिहिले आहे.

नाटक, मालिका, सिनेमा अशा तिन्ही माध्यमात मुक्तपणे वावर करणारे लोकप्रिय अभिनेता म्हणजे वैभव मांगले (Vaibhav Mangale). आपल्या अभिनय कौशल्याने त्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अभिनयाव्यतिरिक्त वैभव मांगले सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच वैभव मांगलेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने आपल्या आजोबांबद्दल लिहिले आहे. त्याच्या आईच्या वडिलांचादेखील सिनेइंडस्ट्रीशी संबंध होता.

वैभव मांगलेने इंस्टाग्रामवर आजोबांचा फोटो शेअर करत लिहिले की, कै . पारीसराव वणकुद्रे. माझे आजोबा (आईचे वडील) श्री. शाहू महाराजांच्या श्री गणेश नाट्य संस्थेमध्ये काम करीत असत.. सं. मानापमान, संशयकल्लोळ, संत तुकाराम, आग्र्याहून सूटका ई… नाटकातून त्यानी कामे केली होती. इचलकरंजीचा प्रयोगाला गेलो असता नाट्यगृहात त्यांचा फोटो पाहिला आणि आत काहीतरी जुळले. 

त्यांना मी कधीच पाहिलं नाही. पण रंगभूमीवर वरच नातं आत कुठेतरी जुळलं आणि मन उचंबळुन आलं. तेच संचित माझ्या ही आत ते पेरून गेलेत याची जाणीव झाली. उत्तम गायचे.. उत्तम स्त्री भूमिका ही करायचे. आजोबा मी कधीच भेटलो नाही पण साष्टांग दंडवत. आतला कलेचा धागा तुम्हीच विणलेला आहे… माझं असं काही नाही, असे त्याने पोस्टमध्ये लिहिले.  

टॅग्स :वैभव मांगले