मराठी अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या विनोदी अभिनयाला तोड नाही. विनोदाचं अचूक टायमिंग साधत त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. त्यांचे महाराष्ट्रातच नाही तर जगभरात चाहते आहेत. अशोक मामांच्या बाबतीतला एक इंटरेस्टिंग किस्सा आपण जाणून घेणार आहोत. गेली ४८ वर्षे अशोक सराफ यांच्या हातातील बोटात एक अंगठी आपल्याला कायम दिसते.
अशोक मामांना १९७४ साली ही अंगठी त्यांचा मित्र विजय लवेकर यांनी दिली होती. विजय लवेकर हे मेकअप आर्टिस्ट म्हणून कलाविश्वात काम करत होते. त्यांचे एक छोटेसे सोनाराचे दुकान होते. लवेकर यांनी बनवलेल्या काही खास डिझाईनच्या अंगठ्या ते स्टुडिओमध्ये घेऊन आले होते. एका बॉक्समध्ये असलेल्या अंगठ्यांमधील एक अंगठी त्यांनी अशोक मामांना निवडण्यास सांगितली. अर्थात एवढ्या सगळ्या अंगठ्या पाहून नेमकी कुठली निवडावी हा प्रश्न मनात न ठेवता त्यांनी त्यातील एक अंगठी निवडली जी त्यांनी लगेचच अनामिकेत घातली.
अंगठीवर नटराजाची प्रतिमा
अशोक सराफ यांनी निवडलेल्या अंगठीवर नटराजाची प्रतिमा कोरण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे अशोक सराफ यांच्या बोटात ही अंगठी अगदी फिट बसली होती त्या अंगठीकडे निरखून पाहत असताना आता ही अंगठी माझी अशी प्रतिक्रिया त्यांनी विजय यांना दिली. अंगठी घातल्यानंतर बरोबर तीन दिवसांनी अशोक सराफ यांना चांगला अनुभव आला.
यशाचा आलेख वाढत गेला...
पांडू हवालदार या चित्रपटाआधी अशोक सराफ यांच्या अभिनयाची कारकीर्दीत फारसे यश मिळत नव्हते. मात्र या अंगठीची कमाल की तिसऱ्याच दिवशी त्यांच्या वाट्याला पांडू हवालदार चित्रपटाची ऑफर चालून आली. या चित्रपटाने अशोक सराफ यांच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली. या चित्रपटाने त्यांच्या यशाचा आलेख वाढत गेला. नवनवीन अनेक दर्जेदार चित्रपटांच्या ऑफर त्यांना येऊ लागल्या आणि त्यांच्या कारकिर्दीची घोडदौड सुरूच राहिलेली पाहायला मिळाली. यावर माझी श्रद्धा आहे किंवा अंधश्रद्धा काहीही म्हणा पण ही अंगठी बोटातून काढायची नाही, असा मी निर्णय घेतला होता, असे अशोक सराफ यांनी सांगितले.