हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे प्रदीर्घ आजाराने आज निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या. सुलोचनादीदी यांना ९ मे रोजी सुश्रुशा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या श्वसनाच्या आजारावर उपचार सुरू होते. अखेर आज संध्याकाळी सहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
अभिनेत्री सुलोचना यांचे पूर्ण नाव सुलोचना लाटकर. त्या सुलोचना दीदी म्हणून सर्वांच्या परिचयाच्या होत्या. त्यांचा जन्म ३० जुलै, १९२८ रोजी कोल्हापूर जवळी खडकलाट गावी झाला. सुलोचना दीदींच्या आई-वडिलांचे अकाली निधन झाल्याने बनूबाई लाटकर यांनी त्यांचा सांभाळ केला. लहानपणापासून अभिनयाची आवड असलेल्या सुलोचना यांनी १९४३ मध्ये मास्टर विनायक यांच्या ‘प्रफुल्ल पिक्चर्स’च्या ‘चिमुकला संसार’ या चित्रपटातून वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी रूपेरी पडद्यावर पदार्पण केले.
१५०हून अधिका सिनेमात उमटवला अभिनयाचा ठसा१९४६ ते १९६१ या काळात सासुरवास (१९४६), वहिनीच्या बांगड्या (१९५३), मीठ भाकर, सांगते ऐका (१९५९), लक्ष्मी आली घरा, मोठी माणसं आदी गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका साकारली. ‘मराठा तितुका मेळवावा’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली जिजाबाईंची भूमिका आजही मैलाचा दगड मानली जाते. २५० हून अधिक मराठी आणि १५० हून अधिक हिंदी सिनेमांमध्ये दीदींनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
कपूर घराण्याच्या तिन्ही पिढ्यांसोबत केलं कामसुलोचना दीदी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप सोडली. १९४३ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर सहकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केलेल्या सुलोचना यांनी कपूर घराण्याच्या तिन्ही पिढ्यांसोबत काम केले होते. बिमल रॉय यांच्या सुजाता चित्रपटात त्यांनी साकारलेली संवेदनशील आईची भूमिका बरीच गाजली. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आईची भूमिका ताकदीने साकारली. एक चरित्र अभिनेत्री म्हणूनही त्यांनी आपली छाप सोडली. देव आनंद,सुनील दत्त,राजेश खन्ना अमिताभ बच्चन आदी सुपरस्टार अभिनेत्यांच्या आईची ऑनस्क्रीन भूमिका साकारली होती. देव आनंद यांची भूमिका असलेल्या बऱ्याच चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या.यामध्ये जब प्यार किसीसे होता है, प्यार मोहब्बत, दुनिया, जॉनी मेरा नाम, अमीर गरीब. , वॉरंट आणि जोशिला आदी चित्रपटांचा समावेश आहे. राजेश खन्ना यांच्या दिल दौलत दुनिया, बहरों के सपने, डोली, कटी पतंग, मेरे जीवन साथी, प्रेम नगर, आक्रमन, भोला भला यांचा समावेश आहे. त्याग , आशिक हूँ बहरों का आणि अधिकार आदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली होती. तर, हीरा, झुला, एक फूल चार कांटे, सुजाता, मेहरबान, चिराग, भाई बहन, रेश्मा और शेरा आदी चित्रपटांमध्ये त्यांनी सुनिल दत्त यांच्यासोबत भूमिका साकारली.
या पुरस्काराने केलं होतं सन्मानित
‘महाराष्ट्रभूषण’, ‘व्ही. शांताराम पुरस्कार’ यांसह अनेक पुरस्कार मिळालेल्या सुलोचना यांना भारत सरकारने १९९९ मध्ये ‘पद्मश्री’ किताबानेही सन्मानित केले. त्यांच्या अभिनय कारकीर्दीविषयी लेखक-पत्रकार इसाक मुजावर यांनी चित्रमाऊली हे पुस्तक लिहिले आहे.