Join us

घराणेशाही, सत्तासंघर्ष आणि राजकीय कुरघोडीचा खेळ रंगणार, 'लोकशाही' सिनेमा या दिवशी भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 20:11 IST

Lokshahi Movie : राजकारणातील महिलांचं अस्तित्व, घराणेशाही, सत्तासंघर्ष, निवडणुकांची रणधुमाळी, राजकीय कुरघोडी, पक्षांचा प्रचार आणि विजयाचा गुलाल लोकशाही चित्रपटात पहायला मिळणार आहे.

राजकारणातील महिलांचं अस्तित्व, घराणेशाही, सत्तासंघर्ष, निवडणुकांची रणधुमाळी, राजकीय कुरघोडी, पक्षांचा प्रचार आणि विजयाचा गुलाल 'लोकशाही' (Lokshahi Marathi Movie) चित्रपटात पहायला मिळणार आहे. अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत लोकशाही चित्रपटाच्या ट्रेलर आणि गीतांनी महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली आहे. हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या भूमिका प्रेक्षकांना खिळवून ठेवणार असून अंकित मोहन, गिरीश ओक, समीर धर्माधिकारी, भार्गवी चिरमुले, अमित रियान, शंतनु मोगे, प्रसन्न केतकर, सुश्रुत मंकणी, अजिता कुलकर्णी, सोनल वाघमारे हे सुप्रसिद्ध कलाकार राजकारणाच्या भयाण खेळात धुरळा उडवणार आहेत.

लोकशाही ही एका घराणेशाहीतल्या एका मुलीच्या वैयक्तिक पेचप्रसंगाची कथा आहे, जी तणावग्रस्त राजकीय नाटकाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या नैतिक अनैतिक कृत्यांवर आधारित आहे. समाजकारणात रस असलेल्या राजकारणी घराण्यात वाढलेल्या मुलीच्या आयुष्यात अनपेक्षित घटनांची साखळी घडत जाते. जी साखळी तिच्या वडिलांच्या हत्येचं कारण बनते. सत्तेच्या हव्यासापोटी रक्ताच्याच नात्यांनी तिच्या वडिलांचा जीव घेतला आहे, मात्र हत्या आणि हत्यामागचा कट कोणाचा आहे हे चित्रपटात कळणार आहे.

लोकशाही चित्रपट सुशीलकुमार अग्रवाल यांनी निर्मित केले असून संजय अमर यांनी कथा, पटकथा आणि दिग्दर्शित केले आहे. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन संजय-राजी या जोडीने केले असून चित्रपटातील गाणी जयदीप बागवडकर आणि राजलक्ष्मी संजय यांनी गायले आहेत, तसेच संजय अमर आणि अल्ट्रा मराठीचे बिझनेस हेड शाम मळेकर यांनी गीतांना शब्द दिले आहेत.

टॅग्स :तेजश्री प्रधान मोहन आगाशेसमीर धर्माधिकारी