Join us

रंगभूमीवर नाट्यरूपात पाहिला सिनेमा- आशुतोष गोवारीकर

By संजय घावरे | Published: November 06, 2023 7:37 PM

'सफरचंद' नाटकाचे सिनेरूपांतर होण्याचे दिले संकेत

मुंबई - 'सफरचंद' या पुरस्कार विजेत्या नाटकातील कोणत्या कलाकाराचे, कोणत्या तंत्रज्ञाचे कौतुक करावे हे समजत नाही. या नाटकाच्या रूपात आज मी 'सिनेमा ऑन स्टेज' बघितला, असे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर म्हणाले. 'सफरचंद' या नाटकाचा शंभरावा प्रयोग गोवारीकरांच्या प्रमुख उपस्थितीत सादर करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. 

संहिता, दिग्दर्शन आणि अभिनयासोबतच उत्तम नेपथ्यामुळे 'सफरचंद' हे नाटक सुरुवातीपासूनच चर्चेत राहिले आहे. मराठी रंगभूमी दिनी पार्ल्यातील दीनानाथ नाट्यगृहामध्ये या नाटकाचा शंभरावा प्रयोग सादर करण्यात आला. या वेळी निर्माते-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेता स्वप्नील जोशी, मुख्यमंत्री तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, दिग्दर्शक राजेश जोशी, कलाकार शंतनू मोघे, प्रमोद शेलार, शर्मिला शिंदे, अमीर तडवळकर, निर्माते भरत ठक्कर, अजय कासूर्डे, प्रवीण भोसले आदी मंडळी उपस्थित होती. मुग्धा गोडबोले यांनी या नाटकाचे मराठी संवाद लेखन केले असून, संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य आहे. यावेळी बोलताना गोवारीकर यांनी नाटकाच्या संपूर्ण टीमचे मनापासून कौतुक केले. ते म्हणाले की, आज 'सिनेमा ऑन स्टेज' बघितला.

अॅक्टिंगमध्ये क्लोजअप सांगितल्यावर सिनेमात ते सहजपणे दाखवता येतात, पण इथे लाईट डिझाईन, साऊंड आणि संपूर्ण तांत्रिक टीमच्या मेहनतीमुळे मला रंगमंचावर सिनेमाच बघत असल्यासारखे वाटले. अशा प्रकारच्या अॅक्शन सिक्वेन्सेससोबतच टायमिंग आणि अॅक्शन-रिअॅक्शन्स पहिल्यांदाच स्टेजवर बघितल्या. अर्थातच यातील मेसेज खूप महत्त्वाचा आहे, पण असा मेसेज जेव्हा सिनेमा किंवा नाटकात देण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा ते थोडेसे कंटाळवाणे होऊ शकते. मनोरंजनाद्वारे मेसेज देणे हे स्कील आहे. नाटक पाहताना मंत्रमुग्ध झालो होतो. मध्यंतर झाले तेव्हा ते का झाले असा प्रश्न पडला. नाटक सलग दाखवायला हवे होते असे वाटल्याचेही गोवारीकर म्हणाले.

निर्मात्यांनी सिनेमाही बनवायला हवा...

यापूर्वी 'कोडमंत्र' आणि 'युगपुरुष' ही दोन नाटके मी बघितली आहेत. दोन्ही नाटके राजेश जोशीचीच होती. या नाटकाबाबत बोलायचे तर नाटकाचे दिग्दर्शन सुरेख आहे. नाटक बघून एका फिल्म दिग्दर्शकाला प्रेरणा मिळणे ही सर्वात मोठी दाद आहे. नाटकाचे प्रयोग होतील की नाही याची धाकधुक असतानाही निर्मात्यांनी प्रयोग केल्याने असे निर्माते सिनेमा बनवण्यासाठी हवे असल्याचेही गोवारीकर म्हणाले.

टॅग्स :आशुतोष गोवारिकर