प्रेक्षक आणि समीक्षक अशा दोघांचेही कौतुक मिळवत जगभरात गाजलेला मराठी ऐतिहासिक सिनेमा 'शेर शिवराज' (Sher Shivraj) आता प्रेक्षकांना घरबसल्या अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या माध्यमातून पाहाता येणार आहे. दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) लिखित आणि दिग्दर्शित हा भव्य चित्रपट शिवाजी महाराजांच्या काळातील एक महत्त्वाच्या अध्यायावर आधारित आहे. हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवासावर आधारित फ्रंचाइजीतील फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड यांच्यानंतरचा चौथा सिनेमा आहे.
शेर शिवराजमध्ये या महान मराठी राजाच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आणि धाडसी प्रसंगाचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. महाराष्ट्र आदिलशाहीच्या शासनाखाली चिरडून निघत होता, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपलं असामान्य बुद्धी चातुर्य आणि धाडसाच्या जोरावर अफझल खानला हरवलं. चिन्मय मांडलेकर यांनी या सिनेमात शिवाजी महाराजांची भूमिका केली असून मुकेश ऋषी बलशाली अफझल खानच्या भूमिकेत आहेत.
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणाले, ‘शिवाजी महाराज हे भारतातील सर्वात महान राजांपैकी एक होते आणि त्यांचं आयुष्य अविस्मरणीय आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या घटनांनी भरलेलं आहे. अमेझॉन प्राइम व्हिडिओशी सहकार्य केल्याचा मला खूप आनंद होत आहे, कारण त्यांच्या मदतीने आम्ही केवळ मराठी प्रेक्षकांपर्यंत नाही, तर जगभरातील इतिहास प्रेमींपर्यंत पोहोचू.’