विनोदाच्या अफलातून टायमिंगने रसिकांचे मनोरंजन करणारे अभिनेते वैभव मांगले (Vaibhav Mangle) आणि लेखक-दिग्दर्शक अभिनेते संतोष पवार (Santosh Pawar) हे विनोदाचे दोन हुकमी एक्के रंगमंचावर एकत्र येत धमाल उडविण्यास सज्ज झाले आहेत. 'मर्डरवाले कुलकर्णी' या आगामी नाटकात हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. येत्या २४ नोव्हेंबरला हे नाटक रंगभूमीवर दाखल होतंय.
'मर्डरवाले कुलकर्णी' नाटकात वैभव मांगले मध्यवर्ती भूमिकेत असून संतोष पवार यांच्या भन्नाट दिग्दर्शनाखाली या नाटकाचा पट रंगला आहे. अष्टविनायक संस्थेचे दिलीप जाधव यांनी नाटकाची निर्मिती केली असून सहनिर्मात्या मयुरी मांगले आणि निवेदिता सराफ आहेत. प्रेक्षकांना मनमुराद हसवण्यासाठी आम्ही सज्ज असून आमच्या दोघांची केमिस्ट्री ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकामध्ये सॉलिड धमाल आणेल, असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला. एकत्र काम करताना आम्हाला खूपच मजा आल्याचे हे दोघेही सांगतात.
अष्टविनायक संस्थेच्या ‘मर्डरवाले कुलकर्णी’ नाटकाचे लेखन जयंत उपाध्ये यांचे असून या निखळ कौटुंबिक मनोरंजक नाटकात भार्गवी चिरमुले, निमीश कुलकर्णी, सुकन्या काळण, विकास चव्हाण आदि कलाकारांच्याही भूमिका आहेत. या नाटकाची गाणी वैभव जोशी यांनी लिहिली असून नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे आहे. प्रकाश योजना रविरसिक तर संगीत आशुतोष वाघमारे यांचे आहे. संतोषची दिग्दर्शनाची अनोखी शैली आणि वैभव यांच्या अभिनयाचा हटके अंदाज ‘मर्डरवाले कुलकर्णी’मध्ये धुमाकूळ घालणार हे नक्की.