मराठी रंगभूमीनं नेहमीच आशयघन नाटकांची परंपरा जपत नाट्यप्रेमींचं मनोरंजन केलं आहे. जिवंत अभिनय पाहण्याची मराठमोळ्या नाट्यरसिकांची हौस मराठी रंगभूमीवरील नाटकांनी नेहमीच भागवली आहे. मिलाप ही नाट्यसंस्था जागतिक पातळीवरील अभिनयाचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चार्ली चॅप्लिन या महानायकावर आधारीत नाटक रसिकांसमोर सादर करणार आहे. मिलाप, थिएटर टुगेदर, अस्तित्व, द बॉक्स आणि चार्ली स्टूडियोज या बॅनरखाली 'द क्लॅप' हे चार्ली चॅप्लिनच्या जीवनावर आधारलेलं नाटक १५ ,१६ ,१७ मार्चला, रात्री ८.०० वा. द बाॅक्स, एरंडवणे, पुणे येथे तर मुंबईत १९ मार्च ला रात्री ८.०० वा. प्रबोधन कार ठाकरे मिनी थिएटर येथे रंगभूमीवर आणण्याची योजना आखली आहे. या नाटकाच्या दृष्यसंकल्पनेची जबाबदारी प्रणव जोशी यांनी सांभाळली आहे.
आपण सर्वचजण बालपणापासूनच चार्लीचे मूकपट पहात आलो आहोत. केवळ संगीताच्या साथीनं चार्लीनं आपल्या हयातीत अभिनयाच्या बळावर असंख्य प्रेक्षकांचं मनोरंजन केलंच, पण आजही त्याचे चित्रपट जगभरातील प्रेक्षकांची करमणूक करत आहेत. चार्ली चॅप्लिन हे नाव आज प्रत्येक माणसाला माहीत आहे. १९२० पासून चार्लीनं मूक चित्रपट क्षेत्रात एक वेगळं स्थान निर्माण केलं. त्याच्या जीवनाबाबत सांगणारे अनेक चित्रपट, पुस्तकं, नाटकं आली. याच वाटेवरील 'द क्लॅप' हे एक वेगळ्या धाटणीचं नाटक आहे. वेगळं अशा अर्थानं की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टी बऱ्याचदा समोर येत नाहीत. आपण काही घटना एकाच चष्म्यातून बघतो आणि त्या व्यक्तीबद्दलचं मत बनवतो. विशेषत: फेमस व्यक्तींच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडतात, ज्यानं त्यांचं आयुष्य बदलतं. याच जोडीला त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या लोकांचंही जीवन पालटतं. चार्लीच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या आहेत, ज्या लोकांसमोर फार कमी आल्या आहेत. त्या गोष्टींमधून एक वेगळाच चार्ली आणि त्याच्याभोवतीची माणसं उलगडत जातात. चार्लीच्या आयुष्याचा हा प्रवास तर इंटरेस्टींग आहेच, पण अजून बऱ्याच गोष्टी मनोरंजक आहेत, ज्या हे नाटक पाहताना रसिकांना अखेरपर्यंत बांधून ठेवतील आणि नाटक संपल्यावर 'द क्लॅप' आपसूक वाजेल. याच कारणामुळं या नाटकाचं शीर्षक 'द क्लॅप' असं ठेवण्यात आलं आहे.
'द क्लॅप' या नाटकाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे चार्लीच्या ब्लॅक अँड व्हाईट फिल्म्ससारखाच या नाटकालाही कृष्णधवल फील देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. चार्लीचा आॅरा तयार करण्यासाठी तशा पद्धतीचे कॅास्च्युम्स आणि सेटसही डिझाईन करण्यात आले आहेत. अशा प्रकारचा प्रयत्न मराठी रंगभूमीवर प्रथमच करण्यात येत असल्यानं निश्चितच 'द क्लॅप'च्या टिमचं कौतुक केलं जाणार आहे. डाॅ. निलेश माने, स्वप्नील पंडीत, नीरज कलढोणे यांनी 'द क्लॅप'चं लेखन केलं आहे. या नाटकात पायल पांडे, सायली बांदकर, दुष्यंत वाघ, वर्धन कामत, सायली पुणतांबेकर, राहुल मुदगल, या कलाकारांच्या भूमिका आहेत. श्रुतिका वासावे यांनी वेशभूषा केली आहे.