Join us

'नोकराची भूमिका...'भरत जाधवने सांगितलं हिंदी सिनेसृष्टीत काम न करण्यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2023 1:41 PM

Bharat jadhav: भरत जाधव याने आजवर अनेक नाटक, मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. परंतु, त्याचा हिंदीमध्ये म्हणावा तसा वावर नाही.

मराठी कलाविश्वातील प्रतिभावंत अभिनेता म्हणजे भरत जाधव(bharat jadhav). आपल्या दमदार अभिनयशैलीच्या जोरावर भरतने कलाविश्वात त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं. नाटक, मालिका आणि सिनेमा अशा सगळ्या ठिकाणी वावरणाऱ्या भरतने आजवरच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या कलाकृतींमध्ये काम केलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये त्याची कायम चर्चा रंगत असते. विशेष म्हणजे मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या या अभिनेत्याने हिंदी सिनेसृष्टीत फार कमी काम केलं आहे. त्यामुळे हिंदी सिनेसृष्टीत काम न करण्यामागचं कारण त्याने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं आहे.

भरत जाधव याने आजवर अनेक नाटक, मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. परंतु, त्याचा हिंदीमध्ये म्हणावा तसा वावर नाही. लवकरच तो स्कॅम २ मध्ये झळकणार आहे. मात्र, ही भूमिका साकारतानाही त्याने विशेष विचार केल्याचं तो म्हणाला. "माझ्याकडे मुळात हिंदीतून फार कामं आली नाहीत. एकदा एक काम आलं होतं. पण त्यातही ती नोकराची भूमिका होती. त्यामुळे मी या भूमिकेला नकार दिला. आगामी 'स्कॅम २' या हिंदी वेब सीरिजमध्ये मी झळकणार आहे. त्यामध्ये मी एका भ्रष्टाचारी अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारतोय", अस भरत जाधव म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "मी एकदा निर्माते तुषार हिरानंदानीला विचारलं की, मी ही भूमिका साकारू शकेन असं तुम्हाला का वाटलं? त्यावर ते म्हणाला, 'मी तुमची सगळी नाटकं पाहिली आहेत. तुम्ही बऱ्याचदा विनोदी भूमिकाच केल्या आहेत. तुम्ही काहीतरी वेगळं करून बघायला हवं. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे अशा चांगल्या भूमिका आल्या तर नक्कीच विचार करेन."

दरम्यान, भरत जाधवने आपल्या अभिनयशैली आणि स्वभावातील मनमिळावूपणा यामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. खतरनाक, खबरदार , गलगले निघाले , जत्रा, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, पछाडलेला, बकुळा नामदेव घोटाळे, बाप रे बाप अशा कितीतरी गाजलेल्या सिनेमांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. तर, त्याचं सही रे सही हे नाटक आजही प्रचंड लोकप्रिय आहे. 

टॅग्स :भरत जाधवसेलिब्रिटीसिनेमानाटक