प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्या आजारी होत्या. मुलगा दिग्दर्शक अभिनय देव यांच्या वांद्रे येथील घरी आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलं, सूना आणि नातवंड असा परिवार आहे. सीमा देव यांनी ८० हून जास्त मराठी आणि हिंदी सिनेमात काम केले आहे. आज संध्याकाळी ५ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत सीमा देव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अभिनेता रमेश देव आणि अभिनेत्री सीमा देव यांना मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन जोडपे म्हटले जायचे. १९६२ साली रमेश देव यांनी नलिनी सराफ म्हणजेच सीमा देव यांच्यासोबत लग्न केले. त्यांच्या लग्नाला ६० वर्षे पूर्ण झाली होती. रमेश देव आणि सीमा देव यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले. एकत्र काम करता करता दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
रमेश देव हे सीमा यांच्यापेक्षा १२ वर्षांनी होते मोठे
रमेश देव आणि सीमा देव यांनी 'जगाच्या पाठीवर' या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम केले आणि इथूनच त्यांच्या प्रेम कहाणीला सुरूवात झाली होती. रमेश देव हे सीमा यांच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठे होते. जगाच्या पाठीवर हा त्यांचा चित्रपट तुफान गाजला. त्यानंतर तब्बल दोन दशके रमेश देव आणि सीमा देव यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले. त्यांचे अनेक चित्रपट नंतर चांगलेच गाजले. १९६२ मध्ये त्यांनी वरदक्षिणा या चित्रपटात एकत्र काम करताना रमेश देव सीमा यांच्या नकळत प्रेमात पडले. या चित्रपटादरम्यान त्यांच्यातील प्रेम फुलले.
शायराना अंदाजात रमेश देव यांनी व्यक्त केलं प्रेम
सीमा यांच्या आई प्रत्येक चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यासोबत असत. त्यामुळे आपल्या भावना व्यक्त करण्याची संधीच रमेश यांना मिळेना. पण एक दिवस त्यांना ही संधी मिळाली आणि त्यांनी शायराना अंदाजात आपले प्रेम व्यक्त केले. नंतर त्यांनी त्याच वर्षी लग्न केले. २०१३ मध्ये त्यांनी त्यांच्या लग्नाची पन्नाशी साजरी केली होती.
रमेश देव यांचे २ फेब्रुवारी, २०२२ रोजी निधन झाले. त्यांची हृदयविकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली. सीमा आणि रमेश यांना अजिंक्य देव आणि अभिनय देव ही दोन मुले आहेत. अजिंक्य देव हा नावाजलेला अभिनेता आहे. तर अभिनय हा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहे.