लहान मुले आणि महिलांच्या वाढत्या गुन्हेगारीवर प्रकाश टाकणारी 'अनटायटल्ड' आणि 'बिटर चॉकलेट' हि दोन नाटके नुकतीच रंगभूमीवर सादर करण्यात आली. 'राईज अप फॉर इक्वॅलिटी' महिला महोत्सवात कलाकार व मान्यवरांच्या उपस्थितीत या नाटकांचे प्रयोग झाले.
रैल पदमसी आणि क्रिएट फाउंडेशनच्या विसाव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत 'अनटायटल्ड' आणि 'बिटर चॉकलेट' हि समर्पक विषयावरील नाटके रंगभूमीवर आणण्यात आली. या निमित्ताने गिरगावातील रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये 'राईज अप फॉर इक्वॅलिटी' महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुले व महिलांसंदर्भातील गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. समाज म्हणून आपणही अमानुष बनत असल्याचे प्रतिबिंब या नाटकांमध्ये पाहायला मिळाले. या अप्रिय परिस्थितीवर उपाय योजणे ही खरी काळाची गरज आहे. या महोत्सवाला सत्यनारायण चौधरी (जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस ग्रेटर मुंबई), जस्टीस नीला गोखले, जस्टीस रेवती मोहिते डेरे, जस्टीस साधना संजय जाधव, अभिनेते कुणाल रॉय कपूर, मकरंद देशपांडे, रैल पदमसी, लुशीन दुबे, असद लालजी, नीरज बजाज, मीनल बजाज, नंदिता पुरी आदी मान्यवर उपस्थित होते. रॉयल ऑपेरा हाऊस आणि अव्हीड लर्निंगच्या सहकार्याने रैल पदमसी यांनी आयोजित केलेल्या या महोत्सवाला आयएमसी महिला विभागाचा पाठिंबा लाभला. द क्रिएट फाउंडेशन आणि बजाज ग्रुपने हा महोत्सव सादर केला.
यावेळी रैल पदमसी म्हणाले की, एकत्रितपणे काम केले तरच महाराष्ट्राला मुलांसाठी आणि महिलांसाठी सर्वात सुरक्षित राज्य बनवू शकू. उपलब्ध असलेल्या माहितीचा प्रसार करण्यासाठी आम्ही पोलिस आणि न्यायव्यवस्थेला सहकार्य करण्यासाठी आहोत. मुलांच्या आणि महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात असलेल्या विविध योजना, कायदे आणि सुविधांची अंमलबजावणी तसेच विस्तारीकरण करण्यासाठी सहकार्य करू.
सत्यनारायण चौधरी म्हणाले की, महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण पोलीस फोर्स बांधील आहे. महिला आणि मुले यांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई पोलिसांकडून ज्या सुविधा उपलब्ध आहेत. जेव्हा गरज पडेल तेव्हा उपलब्ध सुविधांचा वापर करायला हवा.