Join us  

'अभिनेत्याला मारायचा सीन होता, त्यानंतर त्याचे अपघातात...',४४ वर्षांपूर्वीच्या 'त्या' घटनेमुळे नाना आजही आहेत दुःखी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 6:00 AM

Nana Patekar : त्या घटनेनंतर मराठमोळ्या अभिनेत्याची पत्नी कित्येक वर्षे नाना पाटेकर यांच्याशी बोलत नव्हत्या.

जब्बार पटेल (Jabbar Patel) दिग्दर्शित 'सिंहासन' (Sinhasan) हा मराठी चित्रपट १९७९ साली प्रदर्शित झाला होता. अरुण सरनाईक, श्रीराम लागू, रिमा लागू, निळू फुले, जयराम हार्डीकर, नाना पाटेकर (Nana Patekar), श्रीकांत मोघे, मधुकर तोरडमल अशी मातब्बर कलाकार मंडळी चित्रपटाला लाभली होती. राजकारणाचे सिंहासन मिळवण्यासाठी राजकारण्यांची जी धडपड चित्रपटात दाखवली, ती आजवर कोणत्याही चित्रपटाने दाखवली नसावी. त्यामुळे हा चित्रपट मराठी सिनेइंडस्ट्रीतील मैलाचा दगड ठरला होता. नुकतेच या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ४४ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे एक सोहळा आयोजित करण्यात आला.

नाना पाटेकर, जब्बार पटेल, मोहन आगाशे यांनी यावेळी चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला. चित्रपटाचे साक्षीदार आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे देखील उपस्थित होते, तर सुप्रिया सुळे यांनाही मंचावर आमंत्रित केले. जब्बार पटेल सिंहासन चित्रपटाची आठवण सांगताना म्हणतात की, सिंहासन चित्रपट माईल स्टोन ठरला. कित्येक आठवडे हा चित्रपट हाऊसफुल्ल गर्दी करणारा ठरला होता. 

नाना पाटेकर यांनी यावेळी इथे एका दुःखद प्रसंगाची आठवण करून दिली. नाना पाटेकर यांना या चित्रपटासाठी त्यावेळी ३ हजार रुपये मिळाले होते. त्यावेळी १०० रुपयांत माझ्या संपूर्ण कुटुंबाच एक महिन्याचं राशन मिळत होतं. चित्रपटात त्यांना जयराम हार्डीकर यांना मारायचे होते. सिंहासन चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांनी जयराम हार्डीकर नाटकानिमित्त दौऱ्यावर गेले होते. मुंबईला परतत असताना त्यांच्या नाटकाच्या बसला आग लागते. यातच त्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. पण जयराम हार्डीकर यांना मी मारल्यामुळे त्यांच्या पत्नी माझ्याशी कित्येक वर्षे बोलत नव्हत्या. त्यांचे म्हणणे होते की, मी त्यांना मारल्यामुळे अपशकुन झाला. मी चित्रपटात मारल्यामुळेच त्यांचे निधन झाले असे त्या कित्येक वर्षे म्हणत होत्या. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी त्यांची माझ्याशी भेट घडून आली, आम्ही छान बोललो सुद्धा. पण हा चित्रपट केल्यानंतर मला अनेक चित्रपट मिळत गेल्याचे नाना पाटेकर म्हणाले.

टॅग्स :नाना पाटेकर