Join us

‘फर्जंद’च्या पोस्टरमध्ये दडल्यात या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 7:49 AM

‘आपन फकस्त लडायचं... आपल्या राजांसाठी आन् स्वराज्यासाठी...!’ असं म्हणत हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या कोंडाजी फर्जंदच्या पराक्रमाची ...

‘आपन फकस्त लडायचं... आपल्या राजांसाठी आन् स्वराज्यासाठी...!’ असं म्हणत हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या कोंडाजी फर्जंदच्या पराक्रमाची गाथा सांगणारा ‘फर्जंद’ या सिनेमाबाबतची उत्सुकता कमालीची शिगेला पोहोचली आहे. याच उत्साहवर्धक वातावरणात ‘फर्जंद’चे नवे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. ‘फर्जंद’च्या या लक्षवेधी पोस्टरचे सर्वच स्तरांवरून कौतुक होत आहे.‘स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन एलएलपी’ची प्रस्तुती आणि अनिरबान सरकार यांची निर्मिती असलेल्या ‘फर्जंद’चे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर या तरुण दिग्दर्शकाने केले आहे. ‘फर्जंद’चे हे पोस्टर अप्रत्यक्षरीत्या सिनेमात दडलेला गर्भितार्थ सांगणारे असून दिग्पालच्याच संकल्पनेतून आकाराला आले आहे. याबाबत दिग्पाल सांगतो की, खरं तर या पोस्टरच्या डिझाइनमागे दोन संकल्पना आहेत. यापैकी पहिली म्हणजे स्वराज्य हे जिजाऊंच्या मनातील स्त्री संरक्षणासाठी निर्माण झालं. हिंदवी स्वराज्य हा भाग जरी असला तरी स्त्रियांचं संरक्षण करण्यासाठी याची खरी ठिणगी पडली होती. त्यामुळे या पोस्टरचे डिझाईन एखाद्या वटवृक्षासारखे आहे. ज्याच्या मुळाशी जिजाऊ आहेत. त्याला आधार देणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांच्या फांद्या म्हणून हे सर्व मावळे आहेत आणि वर सिनेमाचा नायक कोंडाजी फर्जंद आहे. यामागील दुसरी संकल्पना अशी आहे की, याचे डिझाईन खांबासारखंही आहे. एखाद्या खांबातून भगवान नरसिंह प्रगट व्हावेत तसे छत्रपती शिवाजी महाराज अवतरले आहेत. त्यांच्या हृदयात महाराष्ट्राची कुलस्वामिनी भवानीमाता आहे. या सर्वांच्या मुळाशी पुन्हा जिजाऊ आहेत. त्यांना मावळ्यांनी आधार दिला असून पुन्हा शिखरावर दोन्ही हातात तलवार घेऊन लढवय्या बाण्याचा सिनेमाचा नायक कोंडाजी फर्जंद आहे. मराठीतील हा पहिला युद्धपट असल्याने महाराष्ट्राची रणदेवता समोर आणण्याच्या संकल्पनेतूनही हे पोस्टर तयार करण्यात आले आहे.दिग्दर्शनासोबतच ‘फर्जंद’ची पटकथा-संवादलेखनही दिग्पालने लिहिले आहेत. कोंडाजी फर्जंदची व्यक्तिरेखा अंकित मोहनने साकारली असून, त्याच्या जोडीला चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, गणेश यादव, प्रसाद ओक, अजय पुरकर, हरीश दुधाडे, आस्ताद काळे, प्रवीण तरडे, राजन भिसे, राहुल मेहंदळे, अंशुमन विचारे आदी कलाकार आहेत. संदीप जाधव, महेश जाऊलकर आणि स्वप्निल पोतदार या सिनेमाचे सहनिर्माते आहेत. कलादिग्दर्शन नितीन चंद्रकांत देसाई यांचे असून निखील लांजेकर यांनी ध्वनीलेखन केले आहे. १ जून ला ‘फर्जंद’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.Also Read : प्रसाद बनला हिंदवी स्वराज्याचा गुप्तहेर बहिर्जी नाईक