बदलत्या जमान्याप्रमाणे संभाव्य धोक्यांचे प्रकार बदलत चालले आहेत. इंटरनेटच्या मोहमयी पण गुंतागुंतीच्या जाळ्यात अडकवणारे सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या तऱ्हांनी नेटकऱ्यांना फसवत आहेत. हा अतिशय ज्वलंत विषय असून यातील टक्केटोणपे खाल्लेल्या कुटुंबाची गोष्ट सांगणारा 'टेक केअर गुड नाईट' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने नुकतीच सिनेमातील कलाकार सचिन खेडेकर, इरावती हर्षे आणि लेखक-दिग्दर्शक गिरीश जोशी यांनी लोकमत ऑफिसला भेट दिली.
या चित्रपटाची कथा ही एका शहरातील कुटुंबाची असून या कुटुंबाने आपले स्थैर्य आणि सन्मान यासाठी एका सायबर गुन्हेगाराविरोधात दिलेला लढा यात रेखाटला गेला आहे. हा लढा देताना या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यातील वडिलांना बदलत्या तंत्रज्ञानाचे धडे घेत तंत्रज्ञानाबद्दलचे त्यांचे अज्ञान दूर करून घ्यावे लागते. आपल्या समुपदेशन कौशल्यावर बसलेली धूळ पुसत त्याचा वापर यातील आईला या कामी करून घ्यावा लागतो. आपल्या आई वडिलांबरोबरचा संवादाचा तुटलेला धागा यातील मुलीला पुन्हा जोडावा लागतो. कथेमध्ये मग या सर्व गोष्टी पुढे येतातच पण त्याचबरोबर आजच्या तंत्रज्ञानाने व्यापलेल्या जीवनशैलीचे अनेक पैलूही उलगडत जातात. या चित्रपटाविषयी सचिन खेडेकर सांगतात, सायबर गुन्हेगाराच्या कचाट्यात सापडलेलं एक कुटुंब या सिनेमात आहे. पर्ण पेठे माझ्या मुलीची भूमिका साकारत असून, इंटरनेटविषयी असलेल्या अतिविश्वास आणि बेफिकीरतेमुळे काय काय घडू शकतं हे दाखविले आहे. आजवर त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. यातील भूमिकेला चित्रपटाच्या आगळ्यावेगळ्या विषयामुळे वेगळेपणाची किनार लाभली आहे असं ते म्हणाले.
गिरीश जोशी यांच्यावर लेखक आणि दिग्दर्शक अशी दुहेरी जबाबदारी होती. ते कथेविषयी बोलताना म्हणाले, जगभरात लाखो लोक मोबाइल, क्रेडिट कार्ड, इंटरनेट वापरतात आणि त्यावरून व्यवहार करतात. तो त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग झालेला असतो. अशी कोणती नेमकी गोष्ट असते की, ज्यामुळे सायबर गुन्हेगारांना या लोकांच्या आयुष्यात आणि व्यवहारात शिरकाव करण्याची संधी मिळते, हे मला शोधून काढायचे होते. एक लेखक म्हणून याबद्दल लिहिणे खूप गरजेचे आहे, असे मला वाटत राहिले आणि हा सिनेमा घडला. आदिनाथ कोठारेची भूमिका गुलदस्त्यात असून त्यामुळे या सिनेमातील त्याच्या भूमिकेविषयी उत्सुकता लागून राहिली आहे, हे ट्रेलरमधील प्रतिक्रियांमधून समजत आहे.
इरावती हर्षेने पर्ण पेठेच्या आईची भूमिका साकारली आहे. ती सांगते, आपल्या मुलीच्या मनात काय चाललंय याची कल्पना नसताना सायबर क्राईमच्या माध्यमातून जे समोर आलं ते धक्कादायक होतं. त्या धक्क्यातून सावरत सर्व कुटुंबाने एक होऊन कसा लढा दिला हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि एस पी एन्टरटेन्मेंट यांची प्रस्तुती असलेला ‘टेक केअर गुड नाईट’ संपूर्ण महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटाची निर्मिती हिमांशू पाटील आणि महेश मांजरेकर यांनी केली असून नरेंद्र भिडे यांचे त्याला संगीत आहे. आजवर एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटने अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडियाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही, टाइम प्लीज, मुंबई पुणे मुंबई – २, बापजन्म आणि आम्ही दोघी या काही चित्रपटांची निर्मिती आणि प्रस्तुती कंपनीने केली आहे.