Upcoming Marathi Movies : कोरोना महामारीच्या काळात अख्ख्या चित्रपटसृष्टीचं जणू कंबरडं मोडलं होतं. पण आता ही चित्रपटसृष्टी हळूहळू पूर्वपदावर येतेय. बॉलिवूड इंडस्ट्री पुन्हा जम बसवताना दिसतेय. मराठी इंडस्ट्री सुद्धा मागे नाही. येत्या काळात बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट सिनेमांना मराठी सिनेमे जोरदार टक्कर देताना दिसणार आहेत. त्याची सुरूवात झिम्मा, पावनखिंड, मी वसंतराव या चित्रपटांनी कधीच केलीये.
अलीकडे बॉलिवूडच्या झुंड, द काश्मीर फाइल्स, गंगूबाई काठियावाडी या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर हवा केली. मराठीतले अनेक सिनेमेही या काळात गर्दी खेचताना दिसले. ‘झिम्मा’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर ‘पावनखिंड’ या चित्रपटाने हाऊसफुल्ल गर्दी खेचली. ‘मी वसंतराव’ या चित्रपटालाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. गेल्या शुक्रवारीच प्रदर्शित झालेला ‘शेर शिवराज’ या सिनेमालाही प्रेक्षकांची चांगली पावती मिळतेय. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 1.05 कोटींचा गल्ला जमवला. ‘शेर शिवराज’नंतर मराठीतले बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत सिनेमे रिलीजसाठी सज्ज आहेत.
येत्या काळात धुमाकूळ घालणार हे मराठी सिनेमे
‘शेर शिवराज’नंतर एका आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. तो चित्रपट म्हणजे, चंद्रमुखी (Chandramukhi ). येत्या शुक्रवारी म्हणजे 29 एप्रिलला बॉलिवूडमध्ये टायगर श्रॉफ स्टारर ‘हिरोपंती 2’ आणि अजय देवगण स्टारर ‘रनवे 34’ हे दोन सिनेमे रिलीज होत आहेत. याचदिवशी अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारेचा ‘चंद्रमुखी’ प्रदर्शित होतोय.
13 मे रोजी रणवीर सिंहचा कॉमेडी जॉनरचा ‘जयेशभाई जोरदार’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमाला टक्कर देण्यासाठी मराठीत प्रविड तरडे दिग्दर्शित आणि प्रसाद ओक स्टारर ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ हा आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित बहुचर्चित सिनेमा रिलीज होणार आहे.
आणखी एक मराठी सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. हा चित्रपट म्हणजे प्रविण तरडे दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’. लॉकडाऊनच्या आधीपासूनंच या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. मराठीतील या बिग बजेट सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. 27 मे रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांत झळकणार आहे.