Join us

‘काय झालं कळंना’ या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार या गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 5:13 PM

प्रेमाची नवी व्याख्या मांडणाऱ्या ‘काय झालं कळंना’ या सिनेमाचं दिग्दर्शन सुचिता शब्बीर यांनी केलं आहे. या सिनेमाची निर्मिती पंकज गुप्ता या तरुण निर्मात्याने केली आहे. सुचिता यांनीच या सिनेमाचं लेखनही केलं आहे.

प्रेम हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय... तसाच तो सिनेनिर्माता आणि दिग्दर्शकांच्याही आवडीचा विषय. त्यामुळेच या गुलाबी विषयावर आजवर बरेच सिनेमे बनले आहेत. प्रत्येक दिग्दर्शक आपापल्या परीने प्रेमाचे विविध पैलू दाखवण्याचा प्रयत्न करतो. २० जुलैला प्रदर्शित होणाऱ्या ‘काय झालं कळंना’ या सिनेमातही मनाला भावणारी एक प्रेमकथा पाहायला मिळणार आहे.प्रेमाची नवी व्याख्या मांडणाऱ्या ‘काय झालं कळंना’ या सिनेमाचं दिग्दर्शन सुचिता शब्बीर यांनी केलं आहे. श्री धनलक्ष्मी प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाची निर्मिती पंकज गुप्ता या तरुण निर्मात्याने केली आहे. सुचिता यांनीच या सिनेमाचं लेखनही केलं आहे. ही कथा कॉलेजवयीन जीवनातील अल्लड प्रेमाची असल्याने कथेला न्याय देण्यासाठी नवोदित कलाकारांची निवड करण्यात आली आहे.‘काय झालं कळंना’बाबत दिग्दर्शिका आणि निर्माते सांगतात की, हा सिनेमा निस्वार्थ प्रेमाची कहाणी सांगणारा आहे. प्रेमातील पॅाझिटीव्हीटी दाखवणारा आहे. याला दु:खाची हलकीशी किनारही आहे. दोन्हींचा समन्वय साधणारा हा सिनेमा तरुणाईला सशक्त संदेश देईल. हाच संदेश लक्षात घेऊन आम्ही या चित्रपटाची निर्मिती केल्याचं पंकज गुप्ता सांगतात.चुकीच्या मार्गाने प्रेमाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न काहीवेळा करण्यात येतो, पण या सिनेमातील प्रेम आपली वेगळी बाजू मांडणारे असल्याचं सुचिता म्हणतात. ‘प्रेम खरं असेल, तर ते अखेरपर्यंत साथ देतं, पण ज्या आई-वडिलांनी तुम्हाला जन्म दिला त्यांचं स्वप्न पूर्ण करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. त्यानंतर बाकी सर्व काही. प्रेयसी किंवा प्रियकर तुमच्यावर खरं प्रेम करत असतील तर ते तुम्हाला नक्कीच भेटतील’. असा सकारात्मक संदेश देण्यात आल्याचंही सुचिता म्हणाल्या.या प्रेमळ कथेला सुरेल गीत-संगीताची किनारही जोडण्यात आली आहे. प्रेमाचं गाणं गाताना मृदूपणा हवा. थेट हृदयापर्यंत जाणारं संगीत हवं. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून पंकज पडघन यांनी या सिनेमातील गीतांना संगीत दिलं आहे. ’टकमक टकमक...’ हे पंकजचं पहिलंच आयटम साँग पंकजने केलं आहे. दोन प्रेमगीतं, ’टकमक टकमक’  हे आयटम साँग अशी एकूण पाच गाणी या सिनेमात आहेत.माधुरी अशिरघडे, वलय, शौनक शिरोळे यांनी ‘काय झालं कळंना’ साठी गीतं लिहीली असून, आदर्श शिंदे, सायली पंकज, रोहित राऊत, रुपाली मोघे, सौरभ साळुंखे यांनी गायन केलं आहे. स्वप्नील काळे आणि गिरीजा प्रभू या नव्या जोडीसोबत अरुण नलावडे,  संजय खापरे, वंदना वाकनीस, कल्पना जगताप, श्रद्धा सुर्वे, हेमाली कारेकर, सुयश झुंजुरके, रवी फलटणकर आदी कलाकारांच्या भूमिका या सिनेमात आहेत. किरण कुलकर्णी आणि पल्लवी करकेरा यांनी ‘काय झालं कळंना’ची पटकथा लिहिली आहे. सुचिता यांनी चौफेर कामगिरी करत राहुल मोरेंसोबत संवादलेखन आणि सुजित कुमारसोबत कोरिओग्राफीही केली आहे. कॅमेरामन सुरेश देशमाने यांनी छायालेखन केलं आहे, तर संकलन राजेश राव यांचे आहे. या सिनेमाचे कार्यकारी निर्माते शब्बीर पुनावाला आहेत.२० जुलैला ‘काय झालं कळंना’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे.