Join us  

'प्रेम करुया खुल्लम खुल्ला' सिनेमातल्या या अभिनेत्रीची झाली बिकट अवस्था, आहे अंथरुणाला खिळून

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 1:29 PM

Vidya Patwardhan : कलाकार घडवण्यावर ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य घालवले त्या विद्या पटवर्धन गेल्या काही वर्षांपासून आजारामुळे अंथरुणाला खिळून आहेत.

'प्रेम करूया खुल्लम खुल्ला' सिनेमा तुम्हाला आठवत असेल यांत अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, रेखा राव, रमेश भाटकर, किशोरी शहाणे हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाले होते. चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या घरात राहणारी अंबु हे पात्र साकारले होते विद्या पटवर्धन यांनी. त्यांच्या केसांच्या वेणीची हटके हेअरस्टाईल त्यावेळी तितकीच भाव खाऊन गेली होती. कलाकार घडवण्यावर ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य घालवले त्या विद्या पटवर्धन (Vidya Patwardhan) गेल्या काही वर्षांपासून आजारामुळे अंथरुणाला खिळून आहेत. 

विद्या पटवर्धन या बालमोहन शाळेत शिक्षिका म्हणून जबाबदारी सांभाळत असत. इतकेच नाही तर आपल्या मिळालेल्या पगारातून त्या मुलांना खाऊ वाटप करत असत. या शाळेत शिकणारी बरीचशी मुले आता मराठी सिनेइंडस्ट्रीत नामवंत कलाकार बनलेले आहेत. प्रिया बापट, सचिन खेडेकर, मेघना एरंडे, सुचित्रा बांदेकर, सुकन्या मोने, स्पृहा जोशी अशा कलाकारांना घडवण्यामागे विद्या पटवर्धन यांचा मोलाचा वाटा आहे. विद्या पटवर्धन यांचे वडील पटवर्धन क्लासेस चालवत असत. विद्याताई शाळेत असतानाच नाटकातून सहभाग दर्शवत, सुलभा देशपांडे यांच्याकडे त्या बालनाट्यातून काम करत.

जे जे स्कुल ऑफ आर्टसमधून कलेचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी बालमोहन विद्यामंदिर येथे चित्रकलेच्या शिक्षिकेची नोकरी केली. अभिनयाची आवड तर लहानपणापासूनच होती, त्यामुळे शाळेतील मुलांत त्यांनी अभिनयाची गोडी निर्माण केली. निवृत्तीनंतरही त्यांनी अभिनय क्षेत्रात भरीव योगदान दिले. विनोदी भूमिका असो वा गंभीर, विद्याताईंनी तितक्याच ताकदीने निभावल्या.

बाळाचे बाप ब्रह्मचारी, चिकट नवरा, प्रेम करूया खुल्लम खुल्ला, अगं बाई अरेच्चा, भिकारी अशा चित्रपटात त्यांनी काम केले. विद्या पटवर्धन गेल्या सहा वर्षांपासून गंभीर आजाराला तोंड देत आहेत. या आजारामुळे त्यांना चालता देखील येत नाही. दादर येथे त्या वास्तव्यास असताना आर्थिक अडचणींमुळे त्यांचे हाल होत आहेत. त्यावेळी बालमोहन शाळेचे विद्यार्थी, नामवंत कलाकार आणि शिक्षक मंडळी मदतीला सरसावली. विद्या पटवर्धन आता एका जागेवर बसून आहेत, त्यांना आता बोलताही येत नाही. खाणाखुणा करून त्या आपले मत मांडण्याचा प्रयत्न करतात.