अशोक सराफ (Ashok Saraf) आणि निवेदिता सराफ (Nivedita Saraf) मराठी कलाविश्वात लोकप्रिय जोडपं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे जोडपं अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांनी १९८९ साली गोव्यातील मंगेशी मंदिरात लग्न केले. मात्र तुम्हाला माहिती आहे का, ही जोडी मराठी कलाविश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्याने जमवली आहे. हे अभिनेते म्हणजे सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar). खुद्द त्यांनीच एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांनी मराठी कलाविश्वातील काही कलाकारांच्या जोड्या जमविल्या होत्या. त्यातील एक जोडी म्हणजे अशोक आणि निवेदिता सराफ. याबद्दल नुकतेच तारांगणला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकर यांनी खुलासा केला. ते म्हणाले की, सर्वात महत्त्वाची जोडी मी जमवली ती म्हणजे अशोक आणि निवेदिताची. अशोकला तर लग्नाला नाहीच म्हणत होता. तो म्हणाला की, मला लग्नच नाही करायचं. नको लग्न वगैरे काही. अर्थात त्याचं लग्न झालं नव्हतं. पण तो अशा मनस्थितीत आला होता. त्याचा अपघात झाला होता. त्याला दुखापत झाली होती. त्यातून तो बरा झाला होता. पण त्रासला गेला होता. पण काम सुरू केल्यामुळे त्याला तो मोकळा श्वास घेता येत होता. कामाच्या माध्यमातून तो खूश होता. पण त्याला लग्न करायचे नव्हते.
निवेदिता यांच्या आईचा लग्नाला होता विरोध
सचिन पिळगावकर पुढे म्हणाले की, मी त्याला लग्नासाठी तयार केले. कारण निवेदिताला अशोकसोबत लग्न करायचे होते. तिथे निवेदिताच्या आईचादेखील लग्नाला विरोध होता. मग त्यांनाही मी या लग्नासाठी तयार केले. २७ जून, १९८९ ला अशोक सराफ आणि निवेदिता यांचे लग्न झाले.
या सेटवर जमली अशोक-निवेदिता सराफ यांची जोडी
निवेदिता जोशी आणि अशोक सराफ यांची पहिली भेट नाटकाच्या प्रयोगादरम्यान झाली होती. निवेदिता यांच्या वडिलांनीच अशोक सराफ यांच्याशी तिची ओळख करून दिली होती. या भेटीनंतरच निवेदिता यांनी सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री केली. नवरी मिळे नवऱ्याला हा सचिन पिळगावरचा चित्रपट दोघांच्याही आयुष्यातील महत्त्वाचा ठरला. या सिनेमाच्या शूटिंगवेळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला.