मुंबई - गणेशोत्सव म्हटला तरी सर्व घरात उत्साह, आनंदाचं वातावरण. परंतु पहिल्यांदाच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी बाप्पाचं आगमन होत नाहीये. लग्नानंतरचा सोनालीचा हा दुसरा गणेशोत्सव परंतु नुकतेच सोनालीच्या आजीचं निधन झाल्यानं कुलकर्णी कुटुंबाकडून यंदाचा गणेशोत्सव साजरा होणार नाही. त्यामुळे सोनाली कुलकर्णीनं भावूक पोस्ट लिहित सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सोनाली कुलकर्णीनं फेसबुक पोस्ट टाकत म्हटलंय की, इतक्या वर्षात आम्ही यंदा पहिल्यांदाच गणपती बसवत नाही. आजी म्हणाली होती, मी गणपती येईस्तोवर थांबते, पण...निदान त्या शारिरीक वेदनांतून तिची सुटका झाली. ती जिथे कुठे असेल शांत, समाधानी, आनंदी असेल असं वाटतं. माझी लाडकी आजी आता माझ्या लाडक्या बाप्पाकडेच गेलीय. प्रिय आजी, पुढच्या वर्षी तू शिकवलंयस तसा, नेहमीप्रमाणे तुझ्या मनासारखा गणेशोत्सव साजरा करू असं सोनालीनं म्हटलं आहे.
तसेच सोनालीनं या पोस्टसोबत गेल्यावर्षीच्या गणेशोत्सवाच्या काही आठवणीतील फोटो शेअर केलेत. यात तिने मागील वर्षी स्वत:च्या हाताने गणपती बाप्पाची मूर्ती तयार केली होती. तसेच आजीसोबतचे फोटोही शेअर केले आहेत. दरवर्षी सोनाली कुलकर्णी सिनेमाच्या शेड्युलमधून वेळ काढत आपल्या कुटुंबीयांसोबत पारंपारिक पद्धतीनुसार घरच्या गणपतीचे स्वागत करते. कुलकर्णी कुटुंबात घरी गेल्या तीस वर्षांहून जास्त काळ गणपतीचे आगमन होते. घरात नेहमीच शाडूची मूर्ती विराजमान होते.