Join us

प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी तीन पायांची शर्यत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2016 1:28 PM

सुयोग संस्थेनं तीन पायांची शर्यत हे मनोविश्लेषणात्मक अंगानं जाणारं नवं सस्पेन्स थ्रिलर नाटक नुकतंच रंगमंचावर आणलं आहे. रिचर्ड हॅरिस ...

सुयोग संस्थेनं तीन पायांची शर्यत हे मनोविश्लेषणात्मक अंगानं जाणारं नवं सस्पेन्स थ्रिलर नाटक नुकतंच रंगमंचावर आणलं आहे. रिचर्ड हॅरिस यांच्या द बिझनेस आॅफ मर्डर या नाटकाचं हे रूपांतर. अभिजीत गुरू यांनी ते केलं असून, विजय केंकरे यांनी त्याचं दिग्दर्शन केलं आहे. या नाटकाचं वैशिष्ट? म्हणजे यात गुन्हा आधीच घडून गेलेला नसून, तो अत्यंत थंड डोक्यानं आणि आपल्याला ज्या व्यक्तीला त्यात अडकवायचं आहे तिला त्याकरता बाध्य करून अत्यंत नियोजनपूर्वक घडवला जातो.राजेंद्र नावाचा एक मध्यमवयीन गृहस्थ मादक द्रव्यांच्या रॅकेटमध्ये अडकलेल्या आपल्या मुलाला त्यातून बाहेर काढण्यासाठी असिस्टंट कमिशनर आॅफ पोलीस प्रतापकडे मदतीची याचना करतो. पोलिसी जंजाळात न अडकता मुलाची या रॅकेटमधून सुटका व्हावी अशी त्याची इच्छा असते. त्यासाठी तो प्रतापला मोठा मिनतवारीनं आपल्या घरी येण्यासाठी राजी करून त्यानं आपल्या मुलाला पोलिसी खाक्यानं समजवावं अशी विनंती करतो; जेणेकरून तो ताळ्यावर येईल आणि त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचेल. प्रताप त्यानुसार राजेंद्रच्या घरी मुलाला भेटायला येतो खरा; परंतु त्याआधीच तो कुठंतरी गायब झालेला असतो. त्याचा कसलाच अतापता राजेंद्रला माहीत नसल्यानं काही वेळ वाट बघून प्रताप तिथून निघून जातो. थोडा वेळानं राजेंद्रनं बोलावल्यानुसार शलाका देसाई ही गुन्हेगारीकथा-कादंबºया लिहिणारी लेखिका त्याच्या घरी येते. राजेंद्रची बायको तिची जबरदस्त फॅन असते. शलाका देसाईसारखंच आपणही रहस्यकथालेखिका व्हावं अशी तिची मनिषा असते. परंतु कॅन्सरसारख्या दुर्धर रोगानं आजारी असल्याने ती शलाकाला भेटायला जाऊ शकत नाही. त्यामुळे राजेंद्रच त्यांची भेट घडवून आणण्यासाठी शलाकाला घरी बोलावतो. त्यानं तिच्याकडे आपल्या बायकोची रहस्यकथा वाचायला दिलेली असते आणि तिचा अभिप्राय मागितलेला असतो. ती अत्यंत सामान्य कथा असल्याचं शलाका त्याला स्पष्टपणे सांगते. परंतु राजेंद्र त्या कथेवर शलाकाशी चर्चा करता करता ती कशी चांगली आहे हे तिला पटवून देण्याचा प्रयत्न करतो. त्या कथेवर राजेंद्र इतक्या अधिकारवाणीनं बोलत असतो की त्यानंच तर ती लिहिली नसेल ना, असा संशय शलाकाला येतो. बायको भेटायला येईतो राजेंद्र शलाकाला बोलण्यात गुंतवतो. तिच्या लेखनाबद्दल, त्यातल्या कथानकांबद्दल, तिच्या आयुष्याबद्दल तो शलाकाला खोदून खोदून विचारतो. आपल्याबद्दल या इसमाला इत्थंभूत माहिती आहे याची तिला हळूहळू खात्री पटत जाते. बोलता बोलता तो तिला मद्याचे प्याले रिचवायला भाग पाडतो. तिच्या कथेतील गुन्हेगार व गुन्ह्यामागच्या त्यांच्या मानसिकतेचा ती कसा विचार करते, तिला संबंधित गुन्हंची इतकी तपशिलात माहिती कोण पुरवतं, वगैरे गोष्टी तो तिच्याकडून वदवून घेतो. आणि तिला घोळात घेत आपल्या जाळ्यात अडकवत जातो. या माणसाचा काहीतरी कावा आहे हे शलाकाच्या लक्षात यायला लागतं. तो आपल्या बायकोला भेटवायचं सोडून भलत्याच गप्पा मारतोय हे तिला कळतं. त्याचा यामागे काय हेतू आहे, हे मात्र तिला समजत नाही. त्याची वाढती आक्रमकता पाहता तो आपल्या बाबतीत काहीही करू शकतो याची तीव्र जाणीव तिला होते आणि ती घाबरते. तिथून बाहेर पडू बघते. पण तो तिला जाऊ देत नाही.एवढात अचानक प्रताप तिथं येतो. शलाकाला तिथं पाहून त्याला आश्चयार्चा धक्का बसतो. तीही प्रतापला तिथं पाहून गोंधळून जाते..काय असतं या योगायोगामागचं रहस्य? कोण असतो हा राजेंद्र? प्रताप आणि शलाकाला आपल्या घरी बोलावण्यामागे त्याचा काय हेतू असतो?.. अशा अनेकानेक प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्ष नाटकात शोधणंच इष्ट.