'रूप नगर के चीते' या मराठी सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. आता मराठी सिनेमाचे शीर्षक असं हिंदी का? असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडेल, पण त्यामागील कारणही तसंच आहे. 'रूप नगर के चीते' हे सिनेमाचं शीर्षक ९०च्या दशकात प्रदर्शित झालेल्या एका हिंदी सिनेमात असलेल्या 'हम रूप नगर के चीते है, शिकार पर ही जीते है' या गाजलेल्या संवादावरून प्रेरीत आहे. हा सिनेमा मुख्य भूमिकेत असलेले दोन चीते म्हणजेच जीवलग मित्रांवर बेतलेला असणं हे देखील शीर्षक 'रूप नगर के चीते' ठेवण्यामागील दुसरं कारण आहे.
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध फिल्ममेकर विपुल अमृतलाल शाह यांचे पुतणे संगीतकार मनन शाह यांनी एस एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली 'रूप नगर के चीते' या मराठी सिनेमाची निर्मिती केली आहे. प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या 'स्कूल, कॅालेज आणि लाईफ' या आगामी पहिल्या मराठी सिनेमाचे दिग्दर्शन करणारे विहान सूर्यवंशी हे 'रूप नगर के चीते'चे दिग्दर्शन करीत आहेत. या सिनेमात दोन मित्रांच्या कथेसोबतच मैत्रीतील आजवर कधीही न उलगडलेले काही दुर्लक्षित पैलू सादर करण्यात आले आहेत.