जयदीप दाभोळकर / देवेश फडके
टाईमपास १ आणि २ च्या यशानंतर आता टाईमपास ३ हा चित्रपट पेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लव्ह, इमोशन्स आणि कॉमेडी’ची सांगड असलेल्या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार आहे याची उत्सुकताही तुम्हाला नक्कीच लागली असेल.
टाइमपास १ आणि २ नंतर आता तिसरा भाग कसा घडला आणि हृता दुर्गुळेचं कास्टिंग कसं केलं?
मुंबईतील ज्या भागात मी वाढलोय, बालपण-तारुण्य गेलंय, तेथील लोकांसाठी सिनेमा करावा, या विचारातून टाइपास १ केला, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. रसिक-प्रेक्षकांच्या भरभरून मिळालेल्या प्रेमामुळे लगेचच दुसऱ्या वर्षी टाइमपास २ केला. कोरोना काळात प्रियदर्शन जाधव आणि मित्रमंडळींसोबत गप्पा मारताना टाइमपास ३ चं कथानक सापडलं. अनेकदा याविषयी बोलणं व्हायचं आणि त्या चर्चांतून, मुलांच्या कॉलेजवयीन जीवनावर भाष्य करणारा टाइमपास ३ सादर करतोय. कोरोनाच्या तीव्र कालावधीनंतर निखळ मनोरंजनातून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर एक छान स्माइल येण्यासाठी हा सिनेमा केला. या सिनेमातील दगडू आणि पालवी परस्परविरोधी स्वभावाचे आहेत. पण, प्रत्येक सभ्य माणसात एक टपोरी दडलेला असतो, याच माझ्या नव्या सुभाषितावरून हृता दुर्गुळेची निवड केली. अनेक सोज्ज्वळ, सुसंस्कृत भूमिका करणाऱ्या हृतामध्ये एका पार्टीत मला बिनधास्त, मस्तीवाली मुलगी दिसली आणि तिच्यात सिनेमात हवी असलेली पालवी दडलेली आहे, हे दिसल्याने तिला टाइमपास ३ साठी विचारणा केली.
टाइमपास ३ साठीची विशेष लक्षवेधी निवड म्हणजे संजय नार्वेकर. त्यांच्या भूमिकेविषयी काय सांगाल?
संजय नार्वेकर यांनी वास्तवही केलाय आणि ऑल द बेस्टही केलंय, हाच मोठा फायदा आहे. गंभीर आणि विनोदी अशा दोन्ही शेड या सिनेमात दाखवण्यात आल्या आहेत. बाहेर खुँखार भाई पण घरात आपल्या मुलीसाठी अतिशय हळवा, हे काम संजय नार्वेकरच उत्तमपणे करू शकतात. यापूर्वीच्या टाइमपासमध्ये दोन बाप माणसं ऑलरेडी आहेत. एक म्हणजे भाऊ कदम आणि दुसरी व्यक्ती वैभव मांगले. या दोन्ही ‘बाप’ माणसांसमोर काम करायला तिसराही ‘बाप’ हवा ना, म्हणून तीनही टाइमपास सिनेमात ‘बाप’ हे अभिनयातील ‘बाप’च आहेत.
रवी जाधव आणि प्रथमेश यांनी यापूर्वी याचे दोन भाग केलेत. तुझा त्यांच्यासोबतचा काम करण्याचा अनुभव कसा होता?सरांनी माझ्यावर विश्वास दाखवला नसता तर काही शक्य नव्हतं. कलाकार म्हणून तुम्हाला कायमच ग्रो व्हायचं असतं. मनात एक भीती होती. प्रत्येकाला कायम सेफ खेळायचं असतं. मी त्या भूमिकेत कशी दिसेन हादेखील प्रश्न होता. पालवीसारख्या भूमिकेत कशी दिसेन या सर्वांचा कॉन्फिडन्स सरांनी दिला. अनन्या आणि टाईमपास सलगच्या शुक्रवारी येतायत म्हणून ते लक्षात येतंय. ते वर्षभराच्या अंतरानं चित्रित झाले आहेत. २०२० लॉकडाऊनच्या आधी अनन्या चित्रित झाला आणि दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये टापी चित्रित केलाय.
दगडूची भूमिका साकारुन तर प्रेक्षकांना पार वेडं केलं होतं. या नव्या चित्रपटात दगडू नेमका कसा आहे?
तिसऱ्या भागात दगडूची भूमिका साकारताना जबाबदारी अधिक होती. पहिल्यांदा जेव्हा दगडू केला तेव्हा आम्ही धिंगाणा करत होतो. त्यावेळी सर आम्हाला सीनवर लक्ष द्यायला सांगत होते. त्यांना त्यावेळी अनेक सीन कापावे लागले. टीपी ३ च्या वेळी सरांनी आम्हाला त्या जबाबदारीची जाणीव करून दिली. टीपी ३ हा आपला चित्रपट आहे. सर्वांसोबतच दगडू हा चांगला दिसला पाहिजे. त्यात दगडू सायन्सला अॅडमिशन घेऊन दिलीये. त्यातला इनोसन्स आहे त्याची जाणीव करून दिली. यासाठी आम्हाला त्यांनी टाईमपास १ आणि दोनही सतत पाहायला सांगितले. टाईमपास ३ मध्ये ट्रिपल धमाका आहे.