Join us

'टाइमपास' फेम प्राजूनं वयाच्या २९व्या वर्षी विकत घेतलं मुंबईत स्वतःचं घर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 11:01 AM

Ketaki Mategaonkar : केतकी माटेगावकरचं मुंबईत घर घ्यायचे स्वप्न होते आणि स्वप्नांचा पाठलाग करत तिने आता स्वतःच्या घरात गृहप्रवेश केलेला आहे.

२०१४ साली रिलीज झालेल्या टाईमपास (Timepass) सिनेमातील दगडू आणि प्राजूने प्रेक्षकांच्या मनात घर केले. या चित्रपटात प्राजूची भूमिका अभिनेत्री केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar)ने साकारली होती. केतकी सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान आता तिने चाहत्यांना खुशखबर दिली आहे. तिने स्वतःचे मुंबईत घर विकत घेतले आहे. 

केतकी माटेगावकरचं मुंबईत घर घ्यायचे स्वप्न होते आणि स्वप्नांचा पाठलाग करत तिने आता स्वतःच्या घरात गृहप्रवेश केलेला आहे. उंच आणि शांत ठिकाणी घर असावं या हेतूने केतकीने मुंबईत १९ व्या मजल्यावर फ्लॅट घेतला आहे. या फ्लॅटच्या इंटेरिअरला तिने व्हाइट थीम आणि टिल कलरची थीम वापरली आहे. केतकीला झाडं, पानं, फुलं खूप आवडतात त्यामुळे हॉलच्या भिंतीला तिने तशाच प्रकारचं वॉलपेपर लावले आहे. 

स्वतःच्या जीवावर घ्यायचा होता फ्लॅट

केतकीचे बालपण अतिशय खडतर गेले होते. जेमतेम पैसेच हातात असल्याने घरखर्च कसा भागवावा असा प्रश्न तिच्या वडिलांना पडायचा. मुंबईत कार्यक्रमासाठी यायला ती एसटीने प्रवास करायची. त्यामुळे मोठ्या कष्टाने त्यांनी केतकीला वाढवले होते. पुढे गाण्यातूनच केतकीला प्रसिद्धी मिळत गेली. गोरेगावला वडिलांनी फ्लॅट घेतला होता. तो विकून आपण २ बीएचके घेऊ असा आईचा विचार होता. पण केतकीला स्वतःच्या जीवावर फ्लॅट घेण्याची इच्छा होती. त्यासाठी मुंबईत शोधाशोध सुरू झाली.

१९व्या मजल्यावर घेतला विकत फ्लॅट

नोव्हेंबर २०२२ मध्ये तिने हा फ्लॅट बुक केला. १८ व्या मजल्यावर केतकीच्या बाबांनी फ्लॅट बुक केला तिथेच १९ मजल्यावर केतकीने तिच्या हिमतीवर स्वतःचा पहिला फ्लॅट बुक केला असे दोघांनी दोन फ्लॅट खरेदी केले. स्वतःच्या हक्काचे घर घेण्यासाठी केतकीला बचत देखील करावी लागली. ती सांगते की गेले काही दिवस मी शॉपिंग देखील केली नाही. आईचे दागिने, मैत्रिणींचे कपडे मी वापरले आहेत. माझ्यासाठी फ्लॅट घेणं मुळीच सोपं नव्हतं पण फ्लॅट बुक केल्यानंतर लगेचच एका आठवड्यात ‘मीरा’ फिल्म ऑफर झाली. मी या वयात घर घेतले याचे कौतुक माझ्या आईबाबांना आहे, कारण त्यांनी या वयात २ हजारात घर चालवले होतं. माझ्या काकांना मी घर घेतल्याचे सरप्राईज दिले तेव्हा त्यांनी मला टीव्ही गिफ्ट केला. त्यांनाही माझ्या घर घेण्याचे खूप कौतुक आहे. केतकी या यशाचं श्रेय ती आईबाबांना देते. सोबतच महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, अशोक पत्की आणि फॅन्समुळे हे सर्व शक्य झाले असे ती सांगते.

टॅग्स :केतकी माटेगावकर