Join us

नितीनदादांचं एका शब्दात वर्णन करायचं तर 'फायटर'; ते एक योद्धा होते - मृणाल कुलकर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2023 9:55 AM

"कलादिग्दर्शकाच्या रूपात ते अख्ख्या सिनेमाची जबाबदारी स्वीकारायचे."

नितीनदादांबद्दल अशी बातमी येईल, असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्यांचं एका शब्दात वर्णन करायचं तर ‘फायटर’ असं मी म्हणेन. ते एक योद्धा होते. अनेक चढ-उतार पाहिलेला माणूस... 

विख्यात, जगविख्यात शोज केलेला आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर खूप मोठा सन्मान मिळालेला माणूस होता. कर्जतला एवढा मोठा स्टुडिओ उभारण्याचं स्वप्न बघणारा तो एकमेव माणूस होता. दुसऱ्या कोणी आजवर इतकं मोठं स्वप्न पाहिलं नाही आणि पाहणारही नाही. 

‘राजा शिवछत्रपती’ या गाजलेल्या मराठी मालिकेनिमित्तानं खऱ्या अर्थाने माझा आणि त्यांचा संपर्क वाढला. त्यापूर्वी मी त्यांना केवळ कलादिग्दर्शक म्हणूनच ओळखत होते, पण या मालिकेचे ते निर्माते होते. प्रॉडक्शन कसं असावं, याचं उदाहरण त्यांनी सेट केलं होतं.  प्रॉडक्शनमध्ये सर्व बेस्टच असायला हवं असा त्यांचा आग्रह असायचा आणि तो शेवटपर्यंत कायम राहिला. मी ‘रमा माधव’ चित्रपट लिहिल्यावर पहिल्यांदा त्यांना वाचून दाखवला. ते ‘रमा माधव’चे प्रॉडक्शन डिझाइनर होते. त्यांनी प्रॉडक्शन डिझाइन म्हणजे काय हे पटवून दिलं.

कलादिग्दर्शकाच्या रूपात ते अख्ख्या सिनेमाची जबाबदारी स्वीकारायचे. या चित्रपटासाठी ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आमचे खूप चांगले कौटुंबिक संबंध होते. लेकीचं लग्न झालं तेव्हा ते खूप आनंदात होते. इतका धडाडीचा माणूस असं काही पाऊल उचलेल, असं खरंच वाटलं नव्हतं. - अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी खास लोकमतच्या वाचकांसाठी नितीन देसाईंबद्दल व्यक्त केलेल्या सहवेदना.

टॅग्स :मृणाल कुलकर्णीनितीन चंद्रकांत देसाईसिनेमा