मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्या घरात खूप मोठ्ठा खजिना सापडला आहे आणि ही माहिती तिने खुद्द इंस्टाग्रामवर खजिन्याचा फोटो शेअर करून दिली आहे. आता तुम्हाला या खजिनाविषयी जाणून घेण्याची खूप उत्सुकता असेल ना. मुक्ताने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे आणि म्हटलं की, आज घरात एक खूप मोठ्ठा खजिना सापडला. माझ्या आईने लिहिलेली नाटकं. माझी आई पूर्वी शिक्षिका होती. शाळेतल्या मुलांसाठी तिने भरपूर नाटकं लिहिली, बसवली, पारितोषिकं मिळवली. लहान मुलांना आवडतील ,कळतील अश्या भाषेत तिने इतक्या विविध विषयांवर ही नाटकं लिहिली आहेत, मी आजही वाचताना रमून गेले. काय मज्जा ! आईमुळेच आणि तिने लिहिलेल्या नाटकातचं मी पहिल्यांदा स्टेज वर उभी राहिले होते.
मुक्ताने रंगभूमीवरून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. आम्हाला वेगळे व्हायचेय हे तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीचेच नाटक खूप गाजले होते. त्यानंतर ती घडतंय बिघडतंय, पिंपळपान, आभाळमाया, श्रीयुत गंगाधर टिपरे यांसारख्या मालिकांमध्ये झळकली. अग्निहोत्र ही तिची मालिका तर खूप गाजली होती. या मालिकेतील तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे.
छोट्या पडद्यावर मिळालेल्या यशानंतर ती चित्रपटांकडे वळली. तिने थांग, देहभान यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतरचे जोगवा, डबल सीट, मुंबई-पुणे-मुंबई यांसारखे तिचे चित्रपट प्रचंड गाजले.
मुक्ता काही दिवसांपूर्वी वेडिंगचा सिनेमा, स्माईल प्लीज या सिनेमात दिसली होती.