येत्या १ फेब्रुवारीला स्वप्नील जोशी अभिनीत आणि बहूप्रतिक्षीत असा 'मी पण सचिन' चित्रपट प्रदर्शित होत आहे. सध्या सगळेकडे चित्रपटाची तर चर्चा आहेच पण चित्रपटाच्या गाण्याची देखील जोरदार चर्चा आहे. या 'मी पण सचिन' सिनेमामधील गाणी सगळीकडे धुमाकूळ गाजवत आहेत. या गाजत असणाऱ्या गाण्यांना 'त्रिनीती ब्रदर्स' या त्रिकुटाने संगीत दिले आहे. तर गाण्याचे शब्दही त्यांचेच आहे. हे अप्रतिम संगीत देणाऱ्या या त्रिकुटामधील हर्ष वावरे यांनी या चित्रपटाच्या अनुभवाबद्दल सांगितले " ह्या चित्रपटाचा आमचा अनुभव अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी होता. जेव्हा आमच्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने श्रेयशने आम्हाला चित्रपटातील कथेबद्दल सांगितले तेव्हा आमचे खरे आव्हान होते ते म्हणजे, सिनेमा हा अर्धा ग्रामीण आणि अर्धा शहरी भागात घडतो त्यामुळे तसे संगीत आम्हाला तयार करायचे होते. परंतु, हा चित्रपट करताना श्रेयशने आम्हाला पूर्णपणे मोकळीक दिली होती.
या सिनेमात एक जबरदस्त डान्स असलेले एक गाणे आहे, एक प्रेरणादायी गाणे आहे, तर एक भावनिक आहे आणि एक गाणे दुःखदायक भावनात्मक अशा एकत्रित भावनांचे गाणे आहे. या चारही गाण्यांमध्ये आम्ही अनेक विविध प्रकारच्या वाद्यांचा वापर केला. विविध शैलींचा वापर आम्ही या गाण्यामध्ये केला. या गाण्यांमधून चित्रपटातील परिस्थिती, भावना अगदी अचूक प्रेक्षकांसमोर मांडल्या जाव्या आणि प्रेक्षकांना संगीत आवडावे असा आमचा आणि श्रेयशचा हेतू होता. सुदैवाने आमचा हा हेतू साध्य होत आहे. रसिकांनी अगदी आनंदाने चित्रपटाचे संगीत आपलेसे केले आहे. आम्हाला तशा प्रतिक्रिया देखील मिळत आहे. श्रेयश हा एक ठोस दृष्टीकोन असलेला माणूस आहे. आम्ही याआधी त्याच्या सोबत 'वीर मराठे' हे गाणं केले होते. तेव्हाच वाटले की आपण पुढे एकत्र पुन्हा काम केले पाहिजे आणि तशी संधी श्रेयशने आम्हाला दिली सुद्धा." श्रेयश जाधव यांचे दिग्दर्शन असलेला 'मी पण सचिन' चित्रपट इरॉस इंटरनॅशनल, एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएटची निर्मिती आहे. नीता जाधव, गणेश गीते, संजय छाब्रिया आणि निखिल फुटाणे हे या चित्रपटाचे निर्माता आहे. तर श्रेयश जाधव यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. इरॉस इंटरनेशनलद्वारे 'मी पण सचिन' या चित्रपटाचे जागतिक स्तरावर देखील वितरण केले जाणार आहे.