संकर्षण कऱ्हाडे हा मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेता आहे. अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमधून त्याने अभिनयाचा ठसा उमटवला. नुकतंच त्याने राजकीय परिस्थितीवर कवितेतून बाण सोडले आहेत. त्याची ही एक कविता चांगलीच व्हायरल झाली. यावर अनेक मोठ्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही कविता ऐकून थेट उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संकर्षणला फोन केला.
संकर्षणने नुकतेच एबीपी माझासोबत संवाद साधला. कविता एकून उद्धव ठाकरे यांनी देखील फोन करुन कौतुक केल्याचं सांगितलं. त्याने सांगितलं, सकाळी साडेनऊ वाजता मला त्यांचा फोन आला, ते स्वत: म्हणाले की नमस्कार, जय महाराष्ट्र मी उद्धव ठाकरे बोलतोय. त्यांनी मला मिश्लिक टीप्पणी करत म्हटलं, की तुम्ही आमच्या सुनेचं अस्मितेचं एक मत वाया घालवलत. फार उत्कृष्ट आणि फार सुंदर झालीये'.
संकर्षणने सांगितलं, 'मी त्यांना तुम्ही रागावलात तर नाही ना? असा प्रश्न केला. यावर उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, अजिबात नाही, आजच्या काळात असं खरंखरं लिहिणारं कुणीतरी हवंच की, ज्यांनी खरं काहीतरी बोलावं आणि ते आमच्यापर्यंत पोहचावं. आमच्याही चुका आम्हाला कळतील. इथून पुढेही असंच छान छान लिहित जा, जेणेकरुन तुमच्यामध्ये काय चालू आहे हे आम्हाला कळेल आणि आमच्यापर्यंत ते पोहचेल'.
फक्त उद्धव ठाकरे यांनीच नाही तर शरद पवारांनी संकर्षणच्या कवितेचं कौतुक केलं आहे. तसेच त्याला भेटायला बोलावलं आहे. यासोबतच राज ठाकरे यांनी स्वत: फोन करुन संकर्षणला शिवतीर्थावर बोलावलं होतं. राज ठाकरेंनी संकर्षणच्या कवितेचं कौतुक केलं. तसेच सिनेमा, राजकारण, भारत, महाराष्ट्र अशा सगळ्या प्रकारची चर्चा त्यांनी अगदी आनंदाने संकर्षणसोबत केली. संकर्षण कऱ्हाडेच्या कविता रसिक प्रेक्षकांच्या कायमच पसंतीस पडतात. विषय कोणताही असो संकर्षणच्या शब्दांची जादू प्रेक्षकांच्या मनावर होत असते.