Join us

"लज्जास्पद, एकीकडे कोल्ड प्ले तर इथे ओल्ड प्ले" उदित नारायण यांच्या व्हिडीओवर अभिनेत्याची कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 11:23 IST

हे उदित नारायण नाही, इमरान हाश्मी आहेत, अशा प्रतिक्रिया देत नेटकरी त्यांच्यावर नाराजी व्यक्त करत आहेत.

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण सध्या चर्चेत आले आहेत. त्यांच्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. ६९ वर्षीय उदित याांनी लाइव्ह शोमध्ये महिला चाहत्यांना किस केलं आहे. हे उदित नारायण नाही, इमरान हाश्मी आहेत, अशा प्रतिक्रिया देत नेटकरी त्यांच्यावर नाराजी व्यक्त करत आहेत. यावर आता मराठी अभिनेता पुष्कर जोक यानेदेखील प्रतिक्रिया दिली आहे.

उदित नारायण यांची गाणी ऐकण्यासाठी त्यांच्या लाइव्ह कॉन्सर्टला मोठी गर्दी होताना दिसते. नुकतंच त्यांचं एक लाइव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलं होतं. या कॉन्सर्टमध्ये उदित नारायण त्यांच्या महिला चाहत्यांना किस करताना दिसत आहेत. त्यांच्याबरोबर सेल्फी घेताना एका महिलेनं उदित यांच्या गालावर कीस केलं. मग उदित यांनी तिच्या ओठावर किस केलं. कॉन्सर्टमधील हा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला असून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. 

या घटनेसंदर्भातील एबीपीनं शेअर केलेल्या ग्राफिक्सववर मराठी अभिनेता पुष्कर जोगने कमेंट केली आहे.  पुष्करने कमेंट करत लिहिलं की,"लज्जास्पद...आम्ही खूप मोठे फॅन्स आहोत, पण हे काय बरोबर नाही...त्या मुलीसुद्धा काय कमी नाहीत...एकूणच अवघड झाले...एकीकडे कोल्ड प्ले तर इथे ओल्ड प्ले". सध्या सोशल मीडियावर उदित यांना प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.

 या संपूर्ण घटनेवर उदीत नारायण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना ते म्हणाले,"मी एक सभ्य माणूस आहे. काही लोक या गोष्टी करतात आणि त्याद्वारे आपले प्रेम व्यक्त करतात. पण आता ही गोष्ट व्हायरल करून काय मिळणार? गर्दीत खूप लोक असतात, आमच्यासोबत बॉडीगार्डही असतात, पण चाहत्यांना वाटतं की त्यांना आम्हाला भेटण्याची संधी मिळतेय, म्हणून काही हात मिळवण्याचा प्रयत्न करतात, तर कोणी हाताला किस करतं. हे सगळं त्यांचं प्रेम आहे".

दरम्यान, उदित नारायण यांनी तेलुगू, कन्नड, तमिळ, बंगाली, सिंधी, ओडिया, भोजपुरी, नेपाळी, मल्याळम, आसामी, बघेली आणि मैथिली यासह इतर अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांनी ४ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि ५ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत. तसेच कला आणि संस्कृतीमधील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना २००९ मध्ये पद्मश्री आणि २०१६ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. 

टॅग्स :पुष्कर जोगउदित नारायणसेलिब्रिटीबॉलिवूड