Join us

'तिच्यासारखी बायको मिळाली तर..'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीविषयी बोलला उमेश कामत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2023 3:33 PM

Umesh Kamat: उमेशने केलेलं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे.

प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat) या जोडीविषयी काही वेगळं सांगायची गरज नाही. मराठी कलाविश्वात ही जोडी प्रचंड गाजली आहे. या दोघांमध्ये प्रेम, मैत्री सारं काही आहे. त्यामुळेच लोकप्रिय जोड्यांमध्ये त्यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं.  लवकरच ही जोडी जर तरची गोष्ट या नव्या कोऱ्या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नवा गडी नवं राज्य या नाटकानंतर जवळपास १० वर्षांनंतर ही जोडी रंगमंचावर एकत्र वावरणार आहेत. त्यामुळे ते चर्चेत येत आहेत. यात अलिकडेच उमेशने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रियासोबत लग्न करण्यामागचं कारण सांगितलं.

"दे धमाल या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदा मी प्रियाला पाहिलं होतं. त्या मालिकेच्या टायटल साँगमध्ये ती गोल फिरुन वगैरे जायची ते मला खूप आवडायचं. हा किस्सा मी तिला गेल्या अनेक वर्षांपासून हजारदा सांगितला असेल. त्यानंतर 'आभाळमाया' या मालिकेच्या सेटवर आम्ही पहिल्यांदाच भेटलो. या मालिकेचं संपूर्ण शूटिंग होईपर्यंत आम्ही फारसं एकमेकांशी बोललोही नाही. फक्त शूटिंगच्या शेवटच्या दिवशी आम्ही एकमेकांचे नंबर घेतले", असं उमेश म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "आधी गर्लफ्रेंड मग पुढे जाऊन लग्न झालं. पण, मी आजही तिच्या खूप खोड्या काढतो. मला तिच्या खोड्या काढता याव्यात म्हणून मी तिच्याशी लग्न केलं, असं म्हणायला हरकत नाही. अगदी खरं सांगायचं झालं तर, तिच्यासारखी बायको मिळाली तर आणि काय हवं? तसंच प्रियाने होकार दिल्याने हे नाटक जुळून आलं."

दरम्यान, 'नवा गडी नवा राज्य' या नाटकानंतर तब्बल १० वर्षानंतर ही जोडी एकत्र रंगभूमीवर दिसणार आहे. या नाटकाचं नाव 'जर तरची गोष्ट' असून  या नाटकाचा पहिला प्रयोग ५ ऑगस्टला मुंबईमध्ये आणि १२ ऑगस्टला पुण्यामध्ये होणार आहे. 

टॅग्स :उमेश कामतप्रिया बापटटेलिव्हिजनसेलिब्रिटीमराठी अभिनेता