Join us

असेही एकदा व्हावे' चित्रपटासाठी उमेश-तेजश्रीने केले खास वर्कशॉप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 9:59 AM

सिनेमातील आपल्या भूमिकेत प्राण ओतण्यासाठी प्रत्येक कलाकार आपापल्यापरीने प्रयत्न करीत असतो. आपल्यातील अभिनयकौशल्य अधिक विकसित करण्यासाठी, काहीजण वर्कशॉपदेखील करतात. ...

सिनेमातील आपल्या भूमिकेत प्राण ओतण्यासाठी प्रत्येक कलाकार आपापल्यापरीने प्रयत्न करीत असतो. आपल्यातील अभिनयकौशल्य अधिक विकसित करण्यासाठी, काहीजण वर्कशॉपदेखील करतात. 'असेही एकदा व्हावे' या झेलू इंटरटेंटमेंटस निर्मित आणि सुश्रुत भागवत दिग्दर्शित सिनेमाचे मुख्य कलाकार उमेश कामत आणि तेजश्री प्रधान या जोडीनेदेखील सिनेमातील आपापल्या भूमिकेसाठी खास वर्कशॉप जॉइंट केले होते. येत्या ६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात उमेश कामतची आव्हानात्मक भूमिका असून, यासाठी त्याने विशेष वर्कशॉप केला. या सिनेमातील 'यु नो व्हॉट?' हि उमेश आणि तेजश्रीने म्हंटलेल्या कवितेला प्रेक्षकांचा उंदंड प्रतिसाद लाभत आहे. यात उमेश कामतने स्वतः गिटार वाजवली असूनत्यासाठी त्याने अद्वैत पटवर्धनकडून गिटार वाजवण्याचे खास प्रशिक्षण घेतले. अद्वैतनेदेखील या कवितेला पार्श्वसंगीत देताना उमेशला गीटारीचे कॉर्डस ऑनस्क्रीन लीलया हाताळता येतील, याचे चोख मार्गदर्शन केले होते.  तेजश्री प्रधाननेदेखील या सिनेमातील आपल्या आर.जे.च्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली. त्यासाठी तिने आर.जे.चे खास एक महिना प्रशिक्षण घेतले. रेडियो जॉकींचे बोलणे, श्रोत्यांसोबतचा संवाद, शब्दोच्चार, हजरजबाबीपणा आणि मनोरंजन या सर्व गोष्टी तेजश्रीने अभ्यासल्या. तिने रेडीओ स्टेशनला भेटदेखील दिली,आर.जे.च्या कामाचे निरीक्षण करत आणि त्यांच्याशी संवाद साधत आपल्या सिनेमातील आर.जे. किरणच्या व्यक्तीरेखेत प्राण ओतले. उमेश-तेजश्रीने यापूर्वी 'लग्न पहावे करून' या चित्रपटातून एकमेकांसोबत काम जरी केले असले तरी, त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री दाखवणारा 'असेही एकदा व्हावे' हा पहिलाच सिनेमा आहे. मधुकर रहाणे या सिनेमाचे निर्माते असून, त्यांना रवींद्र शिंगणे यांची बहुमुल्य साथ लाभली आहे. उन्हाळी सुट्टीत मनोरंजनाची परिपूर्ण मेजवानी घेऊन येणारा हा सिनेमा सिनेरसिकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे, हे नक्की !