Join us

'बापल्योक'मधील 'उमगाया बाप रं...' काळजाचा ठाव घेणारं गाणं प्रेक्षक पसंतीस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 11:19 AM

Baaplyok Movie : २५ ऑगस्टला रिलीज होणाऱ्या ‘बापल्योक’ या मराठी चित्रपटातील 'उमगाया बाप रं' हे गीत सध्या ट्रेंडिंगला आहे.

मनाला स्पर्श करणारे बोल.. कर्णमधुर संगीत.. आणि मंत्रमुग्ध करणारा तरल आवाज हे प्रत्येक यशस्वी गीताचे गमक मानलं जातं. एखाद्या चित्रपट प्रदर्शनापूर्वीच त्यातील गाणी जेव्हा रसिकांच्या ओठी रुळतात तेव्हा त्या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच शिगेला पोहचते. २५ ऑगस्टला रिलीज होणाऱ्या ‘बापल्योक’ (Baaplyok Movie) या मराठी चित्रपटातील 'उमगाया बाप रं' या गीताने सध्या अशीच उत्सुकता वाढवली आहे. हे गीत सध्या ट्रेंडिंगला आहे. 

बाप लेकाच्या नात्याची तरल  गोष्ट  सांगणाऱ्या ‘बापल्योक’ या चित्रपटातील हे मनस्पर्शी गीत गुरु ठाकूर यांनी लिहिले असून अजय गोगावले यांनी आपल्या जादुई आवाजाने या गाण्याला चारचाँद लावलेत. विजय गवंडे यांचे संगीत या  गीताला लाभले आहे. नात्याचा अनुबंध प्रत्येकाच्या जीवनाला एक वेगळे वळण देतो. त्यातही काही नात्यांचे सूक्ष्म पदर कदाचित आपल्याला नीट जाणवतही नाहीत; पण ते असतात, अदृश्य रूपात. एखाद्या निकराच्या क्षणी अवचितरीत्या ते सामोरे येतात त्या क्षणी जाणीव-नेणिवेच्या पातळीवर खूप काही सापडलेले असते. तेच या गाण्यातून व्यक्त झाल्याच्या भावना रसिक व्यक्त करतायेत.   

२५ ऑगस्टला 'बापल्योक' चित्रपट होणार प्रदर्शित

बापलेकाच्या नात्यावर आजवर फारसे भाष्य करण्यात आलेले नाही. या चित्रपटाच्या आणि या गीताच्या निमित्ताने बाप लेकाचा प्रवास 'उमगाया'ची मिळणारी संधी प्रत्येकाला समृद्ध करणारी असेल असा विश्वास दिग्दर्शक मकरंद माने व्यक्त करतात. ‘बापल्योक’ या चित्रपटाचे नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते आहेत.‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे,आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि  मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे कथा विट्ठल नागनाथ काळे यांची आहे. पटकथा आणि संवाद मकरंद माने व विट्ठल नागनाथ काळे यांचे आहेत. २५ ऑगस्टला ‘बापल्योक’  चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.