पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ची बालकलाकारांकडून अनोखी दिवाळी भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 4:38 AM
व्यक्ती आणि वल्ली या पु. ल. देशपांडे ह्यांच्या काल्पनिक व्यक्तिरेखांच्या संग्रहाचा, रसिकांना दिवाळीच्या मुहूर्तावर नाट्यफराळ चाखायला मिळणार आहे. गेल्या ...
व्यक्ती आणि वल्ली या पु. ल. देशपांडे ह्यांच्या काल्पनिक व्यक्तिरेखांच्या संग्रहाचा, रसिकांना दिवाळीच्या मुहूर्तावर नाट्यफराळ चाखायला मिळणार आहे. गेल्या तीन वर्षात १५० हून अधिक यशस्वी प्रयोग सादर करणारे गंधार कलासंस्था तसेच कोकण कला अकादमी प्रकाशित आणि अमृता प्रॉडक्शन निर्मित ‘व्यक्ती आणि वल्ली’ हे नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे. विशेष म्हणजे, या नाटकाच्या निमित्ताने पुलंच्या कथासंग्रहातील अंतू बर्वा, भाऊ, सखाराम गटणे, नाथा कामत, नारायण हि पात्र रंगभूमीवर बालकलाकारांकडून जिवंत केले जाणार आहेत. प्रा. मंदार टिल्लू यांचे दिग्दर्शन लाभलेले हे नाटक नाट्यरसिकांसाठी दिवाळीची अनोखी भेट ठरणार आहे.चित्रपट, मालिका तसेच रंगभूमीवर विशेष कामगिरी करणाऱ्या बालकलाकारांचा यात समावेश असून, कैवल्य शिरीष लाटकर, अथर्व बेडेकर, स्वानंद शेळके, वेदांत आपटे, अद्वेय टिल्लू, स्वरा जोशी, यश विघ्नेश जोशी, सुमेध रमेश वाणी अशी बालकलाकारांची मोठी फळी यात पाहायला मिळणार आहे. येत्या २४ ऑक्टोबर रोजी ठाणे येथील गडकरी रंगातयन नाट्यगृहात ‘व्यक्ती आणि वल्ली’ चा पहिला प्रयोग सादर केला जाणार आहे. या नाटकाबद्दल बोलताना नाट्यदिग्दर्शक प्रा. मंदार टिल्लू सांगतात की, ‘अभिनयप्रशिक्षणाची रंगभूमी हि पहिली पायरी असून, बालकलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न याद्वारे केला जातो. तसेच या नाट्याच्या सहाय्याने आजच्या पिढीचा कल नाटकाकडे सर्वाधिक वळवण्याचा आमचा मानस आहे’ असे ते सांगतात. ‘आजच्या बालकलाकारांमध्ये, नाट्याचे बीज रोवले तर भविष्यात रंगभूमीला सुगीचे दिवस येतील. असा विश्वास प्रा. मंदार टिल्लू व्यक्त करतात. या नाटकाच्या निर्मितीत सुप्रसिध्द दिग्दर्शक विजू माने आणि अशोक नारकर यांचा सहभाग आहे. बालरंगभूमीवर होत असलेल्या या नाटकाबद्दल आपले मत व्यक्त करताना विजू माने सांगतात की, 'बालरंगभूमी समृध्द करायची असेल तर, अश्या नाटकांसारखे नाविन्यपूर्ण प्रयोग रंगभूमीवर होणे गरजेचे आहे, आणि त्याच हेतुने आम्ही हे नाटक करायचे ठरवले' तूर्तास ह्या नाटकाचा जोरदार सराव सुरु असून, संपूर्ण महाराष्ट्रात याचे प्रयोग सादर केले जातील. प्रसिद्ध नेपथ्यकार प्रसाद वालावलकर यांचादेखील यात सहभाग असून. शितल तळपदे यांची प्रकाश योजना लाभली आहे. राजू आठवले आणि प्रशांत विचारे यांनी सहाय्यक दिग्दर्शकाची धुरा सांभाळली असून, या नाटकाला वैभव पटवर्धन यांचे पार्श्वसंगीत तर प्रकाश निमकर यांची वेशभूषा लाभली आहे. तसेच शशिकांत सकपाळ यांची रंगभूषा आहे. प्रा. संतोष गावडे, अमोल आपटे, सुनिल जोशी ह्या तिकडींनी निर्मिती सूत्रधाराची धुरा सांभाळली असून, बाळकृष्ण ओडेकर यांनी सहनिर्मितीचा कार्यभाग सांभाळला आहे.