Join us

एका सामान्य प्रसंगाची असामान्य कथा 'फोटो प्रेम'मध्ये, ट्रेलर झाला रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 5:49 PM

'फोटो प्रेम' या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला.

'फोटो प्रेम' चित्रपटाचा प्रीमियर लवकरच अॅमेझॉन प्राइमवर ७ मे रोजी पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला. या चित्रपटात अभिनेत्री नीना कुलकर्णी यांची मध्यवर्ती भूमिका आहे त्याचप्रमाणे अमिता खोपकर आणि समीर धर्माधिकारी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

'फोटो प्रेम' ही ‘माई’ या व्यक्तिरेखेची कथा आहे. आपल्या ‘जुन्या फोटो’मध्ये आपण तितकेसे छान दिसत नसल्यामुळे आपल्या मृत्यूनंतर सर्वांना आपला विसर पडेल याची माईला चिंता असते. माईचा कॅमेऱ्याची भीती घालविण्याचा आणि शेवटी या भीतीवर मात करून परफेक्ट फोटो काढण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. 'फोटो प्रेम' या चित्रपटाची निर्मिती आदित्य राठी, मेहुल शहा आणि गायत्री पाटील यांची आहे आणि आदित्य राठी व गायत्री पाटील या दोघांनी तो संयुक्तपणे लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे.

या ट्रेलरमध्ये माईच्या आयुष्याची झलक दिसते. माई एका मृत व्यक्तीचा लहानपणीचा फोटो पाहून चिंतीत होताना दिसते. तिचे अलीकडील फारसे फोटो उपलब्ध नसल्याने तिच्या मृत्यूनंतर लोक तिला कसे लक्षात ठेवतील, याचा ती विचार करू लागते. त्यानंतर एक परफेक्ट फोटो काढण्यासाठी माईचा उत्कंठावर्धक प्रवास सुरू होतो.या चित्रपटाबद्दल सांगताना नवोदित दिग्दर्शक आणि सहलेखक आदित्य राठी म्हणाले, “फोटो प्रेम' ही एका सामान्य प्रसंगाची असामान्य कथा आहे आणि प्रत्येकाला ही कथा त्यांच्या जवळची कथा वाटेल. प्रत्येक माणसामध्ये आढळणारी भावनिक बाजू या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. आपल्या मृत्यूनंतर जग आपल्याला कसे लक्षात ठेवेल याचा ते विचार करू लागतात, हा धागा या चित्रपटाच्या माध्यमातून पकडण्याचा प्रयत्न केला आहे. ”

अभिनेत्री नीना कुलकर्णी म्हणाल्या, “'फोटो प्रेम' ही अत्यंत बारकावे टिपणारी आणि विचार करायला लावणारी कथा आहे आणि या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिका निभावता येणे हे कोणत्याही बहुमानापेक्षा कमी नाही. या चित्रपटात एक निरागस आणि विशुद्ध भावना दर्शविण्यात आली आहे आणि या व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला आहे. 'फोटो प्रेम' या चित्रपटातील माईची गोष्ट शक्य तितक्या विस्तृत पातळीवर दाखविली गेली पाहिजे. हा चित्रपट सर्वांना पाहावा असा आहे आणि ज्या प्रेमाने आम्ही हा चित्रपट तयार केला तेवढेच प्रेक्षकांचेही प्रेम या चित्रपटाला लाभेल, अशी मला आशा आहे.”