‘माझा एल्गार’ चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 10:48 AM
मनोरंजनापलीकडे जात चित्रपटांतून अभिव्यक्तीचा शोध घेणारे मराठी चित्रपट मोठ्या संख्येने दिसतायेत. तारुण्याच्या पंखात आकाशाला गवसणी घालण्याचे बळ असते. व्यवस्थेविरुद्ध ...
मनोरंजनापलीकडे जात चित्रपटांतून अभिव्यक्तीचा शोध घेणारे मराठी चित्रपट मोठ्या संख्येने दिसतायेत. तारुण्याच्या पंखात आकाशाला गवसणी घालण्याचे बळ असते. व्यवस्थेविरुद्ध बंड करणारी तरुणाईच असते. भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध एका स्त्रीने केलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा ‘माझा एल्गार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. येत्या १० नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सद्गुरू फिल्मस प्रस्तुत ‘माझा एल्गार’ चित्रपटाचे निर्माते सौरभ आपटे तर प्रस्तुतकर्ते श्रीकांत आपटे आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन मिलिंद कांबळे यांचे आहे. याप्रसंगी बोलताना चित्रपटाचे निर्माते सौरभ आपटे सांगतात की, समाजाचे आपणही काही तरी देणे लागतो या भावनेतून ‘माझा एल्गार’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. चित्रपट म्हणजे मनोरंजन हे जरी खरे असले तरी त्यातून सामाजिक प्रश्न मांडणेही गरजेचे असल्याचे सांगताना हा चित्रपट आणि यातील गीते प्रेक्षकांना भावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.‘माझा एल्गार’ चित्रपटात वेगवेगळ्या जॉनरची चार गीते आहेत. ‘बा इठ्ठला तुझं रूप दाव रं’ या मनाचा ठाव घेणाऱ्या गीताला आदर्श शिंदे यांनी स्वरसाज दिला आहे. ‘थांब ना... अजून क्षणभर थांबना’ हे प्रेमगीत सौरभ शेटे आणि आनंदी जोशी यांनी गायले आहे. ‘अन्याय तुडवण्यासाठी’ या स्फूर्तीदायक गीताला सौरभ शेटेचा आवाज लाभला आहे. ‘आयना का बायना’ हे जोशपूर्ण गाणे अवधूत गुप्तेने गायले आहे. अभिजीत सकपाळ आणि मिलिंद कांबळे यांनी ही गीते लिहिली आहेत.ऐश्वर्या राजेश, स्वप्नील राजशेखर, यश कदम, अमोल रेडीज, अर्चना जोशी, ऋचा आपटे, गांधार जोशी, प्रफुल्ल घाग, राजकिरण दळी, गोपाळ जोशी, सचिन सुर्वे, नितीन जाधव, पूजा जोशी, वैदेही पटवर्धन हे कलाकार या चित्रपटात आहेत. चित्रपटाची पटकथा, संवाद चेतन किंजळकर यांनी लिहिले आहेत. छायांकन उमेश पोफळे तर संकलन नकुल प्रसाद– प्रज्योत पावसकर यांचे आहेत. संगीत सौरभ- दुर्गेश या संगीतकार जोडीने दिले आहे. नृत्यदिग्दर्शन प्राण हंबरडे यांचे आहे. वेशभूषा अरविंद गौड यांची तर रंगभूषा भरत प्रजापती, आरती यांची आहे. जितेंद्र जैस्वार चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.