सध्या मराठी सिनेमांची जोरदार चर्चा आहे. 'वेड', 'वाळवी', 'झिम्मा', 'महाराष्ट्र शाहीर' हे अलीकडेच गाजलेले काही मराठी चित्रपट. आता आगामी 'बबली' (Babli) सिनेमाचीही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. सतीश समुद्रे (Satish Samudre) यांनी सिनेमाची निर्मिती केली असून लेखनही केलं आहे. इतकंच नाही तर सतीश समुद्रे हेच ते टॅक्सी चालक आहेत ज्यांनी स्वत:च्या आयुष्यावर हा चित्रपट बनवला आहे.
आगामी 'बबली' सिनेमासंदर्भात सतीश समुद्रे यांच्याशी बातचीत केली असता लक्षात आले की त्यांनी इथे पर्यंत पोहाचाण्या साठी खूप मोठा खडतर प्रवास केला आहे. कित्येक वर्षांपासून चित्रपटक्षेत्रात येण्याचं त्यांचं स्वप्न होतं पण त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. याच जबाबदारीचं भान राखत त्यांनी टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करायला सुरुवात केली. तरी काम करत करतच त्यांनी अखेर आपलं स्वप्न पूर्ण केलंच. 'बबली' सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी अखेर चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित झाला आहे. तसंच सिनेमातील 'दादा नको म्हणू' हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं आहे.
'तू काही बी म्हण बबले फक्त दादा नको म्हणू' या टॅगलाईनने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. ही एक प्रेमकथा आहे. रॉबर्ट मेघा यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. गगन गजरलवार, मानसी सुभाष, विवान वैज्ञ, अनिरुद्ध चौथमौल यांची सिनेमात मुख्य भूमिका आहे. २३ जून रोजी 'बबली' संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.