सध्या मराठी कलाविश्वात अनेक नवनवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या प्रत्येक सिनेमातून एक वेगळी कथा उलगडली जात आहे. त्यामुळे नवनव्या धाटणीचे हे सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहेत. यामध्येच राजकारणावर आधारित सिनेमांना विशेष पसंती मिळत आहे. त्यामुळेच सध्या सोशल मीडियावर खुर्ची या आगामी सिनेमाची चर्चा रंगली आहे.
‘सत्ता कुणाची पण असो, आता खुर्ची आपलीच’ असं म्हणत प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा ‘खुर्ची’ हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘खुर्ची’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली होती, तेव्हापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली होती. आता या ‘खुर्ची’चं राजकारण पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे. ‘खुर्ची’ हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच १२ जानेवारी २०२४ मध्ये मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे.
‘खुर्ची’ चित्रपटाच्या रिलीज डेटसोबतच आता या चित्रपटाचं नवं मोशन पोस्टर देखील सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहे. या मोशन पोस्टरमध्ये निवडणुकीचा धुराळा उडताना दिसत आहे. तर, लोक हातात झेंडे घेऊन जल्लोष करत आहे. पार्श्वभूमीवर दमदार संवाद आणि गाणं ऐकू येत आहेत. तर, या जल्लोषाच्या केंद्रस्थानी एक खुर्ची आहे. ढोल ताशे आणि माणसांच्या इतक्या गर्दीतही ही सत्तेची ‘खुर्ची’ मात्र सोन्यासारखी चमचमत आहे. अगदी राजेशाही असा या खुर्चीचा थाट आहे. याच ‘खुर्ची’साठी रंगलेली चुरस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या खुर्चीसोबतच ‘आता खुर्ची आपलीच’ म्हणत चित्रपटाची रिलीज डेट सांगण्यात आली आहे.
सिनेमात आहे ही तगडी स्टारकास्ट
या सिनेमा अक्षय वाघमारे, आर्यन, राकेश बापट,प्रीतम कागणे, श्रेया पासलकर सुरेश विश्वकर्मा, महेश घग, कल्याणी नंदकिशोर ही कलाकार मंडळी झळकणार आहेत. तर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि अभिनेत्री आराधना शर्मा यांच्या विशेष भूमिका या चित्रपटात दिसणार आहेत.
दरम्यान, सत्तेसाठी रंगणारा थरारा खुर्ची या सिनेमात पाहायला मिळणार असून नुकतीच या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. हा सिनेमा १२ जानेवारी २०२४ म्हणजेच पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची निर्मिती आराध्या मोशन फिल्म्स आणि योगआशा फिल्म्स यांच्या अंतर्गत करण्यात येणार आहे. तसंच सिनेमाची निर्मिती संतोष कुसुम हगवणे व योगिता गवळी करत आहेत. विशेष म्हणजे सिनेमाचं दिग्दर्शन सुद्धा संतोष हगवणे आणि शिव धर्मराज माने हे करणार आहेत.