लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बालवयातच सिनेसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांसोबत रुपेरी पडदा गाजविणारे अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी मिरास - फेस्टिव्हल ऑफ हिंदुस्थानी कल्चर अँड लिटरेचर या कार्यक्रमात बोलताना मराठी बरोबरच उर्दू भाषेवर आपले अपार प्रेम असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी मीना कुमारींची आठवण सांगितली.
वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये भारतीय भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचे संवर्धन आणि प्रसार करणाऱ्या ‘पसाबण - ए -अदब’ यांच्या वतीने ‘मिरास’चे आयोजन करण्यात आले होते. भारतीय साहित्य, कविता, संगीत क्षेत्रातल्या मान्यवरांच्या उपस्थितीत रंगलेल्या दोनदिवसीय महोत्सवात सचिन यांना उर्दू भाषेवर प्रेम कसे जडले, असा प्रश्न विचारण्यात आल्यावर उर्दू भाषा माझ्या आयुष्याचाच नाही तर माझ्या शरीराचाच एक भाग असल्याचे ते म्हणाले.
अन् मीनाकुमारींकडे सुरू झाली शिकवणीसचिन म्हणाले की, हिंदी चित्रपटात बाल कलाकार म्हणून माझा प्रवास सुरू झाल्यावर दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी यांचा ‘मजली दीदी’ चित्रपट करत होतो. ग्रेट ट्रॅजिडी क्वीन मीनाकुमारी ‘मजली दीदी’ साकारत होत्या. चित्रीकरण सुरू असताना मिनाजींनी मला बोलावले आणि तू घरी कोणती भाषा बोलतोस असे विचारले. मी म्हटले मराठी. मग त्या म्हणाल्या की, हिंदी कधी बोलतोस ? मी सांगितले सेटवर. ते ऐकून त्या म्हणाल्या की, तू आई-वडिलांना सेटवर घेऊन ये. आई-वडील सेटवर आल्यावर मीनाजी म्हणाल्या की, तुमचा मुलगा उत्तम अभिनेता आहे, पण त्याच्या हिंदीमध्ये मराठीचा लहेजा असल्याचे जाणवते. त्याला उर्दू बोलता येणे गरजेचे आहे. आठवड्यातून चार दिवस त्याला माझ्याकडे पाठवा. मी याला उर्दू बोलायला शिकवेन. मी गाडीतून जुहूला जायचो. गेल्यावर आधी एक तास टेबल टेनिस खेळायचो आणि मग त्या एक तास उर्दू शिकवायच्या.