वैशाली सामंत बनली गीतकार आणि संगीतकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2016 11:24 AM
गायिका वैशाली सामंतचे लाल इश्क या चित्रपटातील चांद मातला या गाण्याचे सध्या सगळेच कौतुक करत आहे. या गाण्याच्या यशानंतर ...
गायिका वैशाली सामंतचे लाल इश्क या चित्रपटातील चांद मातला या गाण्याचे सध्या सगळेच कौतुक करत आहे. या गाण्याच्या यशानंतर आता वैशाली सामंत एका चित्रपटाला संगीत देणार आहे. यापूर्वीही वैशालीने चित्रपटांना संगीत दिले आहे. पण या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात तिने सुबोध भावे आणि क्रांती रेडकर या नॉन सिंगर्सना गायला लावले आहे. याबाबत वैशालीने सीएनएक्सोबत मारलेल्या गप्पा...लाल इश्क या चित्रपटातील चांद मातला या गाण्यासाठी तुझे सगळेच कौतुक करत आहेस, या गाण्याच्या यशाबाबत काय सांगशील?चांद मातला या गाण्याचा बाज थोडासा वेगळा असल्याने रसिकांना हे गाणे खूप आवडत आहे. लाल इश्क या चित्रपटाविषयी मला ज्यावेळी सांगण्यात आले, त्यावेळी संजय लीला भन्साली यांच्या प्रोडक्शनमध्ये गायला मिळतेय याचा आनंद मला खूप झाला होता. कारण संजय लीला भन्साली यांच्या सगळ्याच चित्रपटांची गाणी खूप चांगली असतात. संगीताची जाण असणारे खूपच कमी दिग्दर्शन असतात. संजय त्यातील एक आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्यास मी उत्सुक होती. पण त्याचवेळी मला दडपणही आले होते. कारण मला या गाण्याच्या निमित्ताने खूप चांगली संधी मिळाली होती. काहीही करून मला ही संधी वाया घालवायची नव्हती. त्यामुळे मी माझे बेस्ट दिले आणि आज ते लोकांना आवडतही आहे. चित्रपटाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगला संजय आले नसले तरी त्यांचे सगळ्या गोष्टींमध्ये बारीक लक्ष होते. रेकॉर्डिंग झाल्यावर त्यांनी गाणी ऐकली. त्यानंतर चांद मातला या गाण्यातील एका कडव्याचे पॅटर्न त्यांनी बदलायला सांगितले. त्याचे हे बदल आमच्यासाठी खूप महत्त्वाचे होते. हे गाणे रेकॉर्ड झाल्यावर मी ते खूप छान गायले असल्याचेही त्यांनी मला कळवले होते. चांद मातला या गाण्यासाठी केवळ प्रेक्षकच नव्हे तर इंडस्ट्रीतील अनेकजण माझे कौतुक करत आहेत. तू आता एका चित्रपटाला संगीत देत आहेस, तसेच या चित्रपटातील गाणीही तू लिहिली आहेस. गायिका म्हणून प्रस्थ निर्माण केल्यानंतर संगीतकार आणि गीतकार म्हणूनही तू स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करत आहेस. संगीतकार आणि गीतकार बनण्याचा विचार कसा केलास?मी याआधीही संगीतकार आणि गीतकार म्हणून काम केले आहे. रसिकांनी माझ्या कामांना दादही दिली आहे. माझ्या आगामी चित्रपटात केवळ दोन गाणी आहेत. त्यातील एक गाणे जसराज जोशीने गायले आहे तर दुसरे गाणे सुबोध भावे आणि क्रांती रेडकर यांनी गायले आहे. चित्रपटात केवळ एकच गाणे असणार असल्याचे ठरले होते. गाण्याचे संगीत देत असताना गाण्याचे बोल मला सुचले. त्यामुळे संपूर्ण गाणे लिहायचेच मी ठरवले. त्या गाण्यासाठी पुरुष आवाजाची आवश्यकता असल्याने ते गाणे मी न गाता त्या गाण्यासाठी मी जसराज जोशीची निवड केली. या चित्रपटाचे चित्रीकरण झाल्यावर प्रमोशनसाठी एखादे गाणे असावे असे चित्रपटाच्या निर्मात्यांना वाटले आणि त्यामुळे दुसर्या गाण्याचा विचार करण्यात आला. या चित्रपटात पहिल्यांदाच क्रांती आणि सुबोधची जोडी झळकणार असल्यामुळे हे प्रमोशनल गाणे त्या दोघांनी गावे असे माझे आणि निर्मात्यांचेही मत पटले. त्यामुळे प्रमोशनल साँग कोणत्याही गायकाकडून गावून न घेता आम्ही ते सुबोध आणि क्रांतीला गायला लावले. क्रांती आणि सुबोध या दोन नॉन सिंगर्सकडून गाणे गावून घेण्याचा अनुभव कसा होता?क्रांती आणि सुबोध यांना गाणे गाण्याच्या आधी चांगलेच टेन्शन आले होते. त्यामुळे थेट रेकॉर्डिंग न करता मी त्यांच्याकडून अनेक वेळा रिहर्सल करून घेतल्या. रिहर्सलच्यावेळी दोघांनाही गाण्याचा चांगला अंदाज आला होता. त्यामुळे रेकॉर्डिंग सुरूळीत झाले. केवळ त्यांना माईकचा जजमेंट यायला थोडा वेळ लागला. क्रांतीचा आवाज तर रसिकांसाठी एक सरप्राईझ असणार आहे. नॉन सिंगर्सना गायला लावण्यात खरेच एक वेगळी मजा असते.