Join us  

Valentine Day 2023: तिने मागे वळून पाहिलं अन्..., अशोक सराफ-निवेदितांच्या लव्हस्टोरीचा किस्सा माहितेय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 3:00 PM

Ashok Saraf Nivedita Saraf : एका मुलाखतीत खुद्द अशोक सराफ यांनी हा किस्सा सांगितला होता.

आज जगभर व्हॅलेन्टाईन डे साजरा होतोय. हा दिवस म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. तसाच प्रेमाच्या आठवणींना उजाळा देण्याचाही दिवस. आज व्हॅलेन्टाईन डे निमित्त अशोक सराफ आणि निवेदिता जोशी यांची लव्हस्टोरी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हणतात. अशोक सराफ व निवेदिता यांच्याबाबतीत असंच म्हणता येईल. अशोक सराफ व निवेदिता यांच्यात 18 वर्षांचं अंतर आहे. ते पत्नीपेक्षा 18 वर्षांनी मोठे आहेत.  अशोक सराफ यांचा ‘दोन्ही घरचा पाहुणा’ हा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा निवेदिता अवघ्या सहा वर्षांच्या होत्या. अशोक आणि निवेदिता यांची पहिली भेट एका नाटकाच्या प्रयोगावेळी झाली होती. निवेदिता यांच्या वडिलांनी मुलीची ओळख अशोक यांच्याशी करून दिली होती.

कालांतराने निवेदिता यांनीहीदेखील अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं. तेव्हा त्यांना अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. काम करता करता त्यांच्यात छान मैत्री झाली. ‘नवरी मिळेल नवऱ्याला’ सिनेमात दोघांनी काम केलं. सिनेमात काम करताना त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु हे लग्न निवेदिता यांच्या घरच्यांना मान्य नव्हतं. आपल्या मुलीने चित्रपट क्षेत्रातील व्यक्तीशी लग्न करू नये अशी निवेदिता यांच्या आईची इच्छा होती. परंतु निवेदिता आपल्या निर्णयावर ठाम होता. अखेर घरच्यांनी नमतं घेत दोघांच्याही लग्नाला संमती दिली, इथपर्यंतची स्टोरी सगळ्यांना ठाऊक आहे. पण या लव्हस्टोरीचा एक किस्सा कदाचित तुम्हाला ठाऊक नसावा. एका मुलाखतीत खुद्द अशोक सराफ यांनी हा किस्सा सांगितला होता. निवेदिता यांच्यावर आपलं प्रेम आहे, याची जाणीव कशी झाली, त्या नेमक्या क्षणाबद्दल त्यांनी मुलाखतीत सांगितलं होतं.

तो खास क्षण...तर तो खास क्षण होता 'मामला पोरीचा' या सेटवरचा. होय, निवेदिता व अशोक सराफ दोघंही या सिनेमात होते. त्या दिवशी निवेदितांचं शूट संपलं आणि त्या अशोक सराफांना बाय म्हणत निघू लागल्या.  अशोक सराफ यांनी त्या दिवशीचा किस्सा शेअर केला होता. ते म्हणाले होते,''पॅकअप झाल्यावर निवेदिता मला बाय म्हणाली. पण का कुणास ठाऊक ती जातेय म्हटल्यावर वाईट वाटू लागलं. मी चेहऱ्यावर दिसू दिलं नाही. पण मी दु:खी होतो. माझा निरोप घेऊन ती निघाली. अचानक त्याचक्षणी डोक्यात विचार आला. त्या लाकडाच्या चौकटीजवळ गेल्यावर ती नक्की आपल्याकडे वळून पाहणार.. नेमकं तसंच झालं. त्या चौकटीजवळ पोहोचताच तिने माझ्याकडे वळून पाहिलं. तोच एक क्षण. त्याच क्षणानं मला प्रेमाची जाणीव करून दिली. आपल्यात नक्की काहीतरी आहे, असं मला वाटलं. पुढे 'नवरी मिळे नवऱ्याला' सिनेमाच्या सेटवर आम्ही एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिली आणि 'ब्रह्मचारी' सिनेमाच्या सेटवरनं अचानक गोवा गाठून तिथल्या मंगेशीच्या देवळात लग्नगाठ बांधली''.

टॅग्स :अशोक सराफनिवेदिता सराफमराठी अभिनेता