मातीशी नाळ जोडलेला अस्सल मराठी अभिनेता संदीप पाठक. उत्कृष्ट अभिनेते, साहित्यप्रेमी, वाचक तसेच सामाजिक प्रश्नांची जाणीव असणारा अभिनेता अशी संदीपची ओळख आहे. आपल्या अभिनय कौशल्याने मराठी रंगभूमी समृद्ध करणारा संदीप सध्या चर्चेत आहे. भर पावसात नाटक पाहण्यासाठी आल्या म्हणून त्याचे आभार मानत संदीप पाठक प्रेक्षक महिलेच्या पाया पडल्याचं दिसून आलं आहे. त्याच्या या कृतीनं सर्वांचं मन जिंकलं.
संदीप पाठक हा सध्या 'वऱ्हाड' नाटकाच्या माध्यमातून महाराष्ट्रात दौरा करीत आहे. नुकतंच त्याच्या 'वऱ्हाड' नाटकाचा अंक विलेपार्लेमध्ये पार पडला. मुंबईत एवढा पाऊस असतानाही एक महिला प्रेक्षक गिरगावहून त्याचं नाटक पाहण्यासाठी आल्या होत्या. प्रचंड पावसातही प्रेक्षक नाटक पाहायला येत असल्याचं पाहून संदीप भावूक झाला आणि थेट महिला प्रेक्षकाच्या पाया पडला.
संदीपनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यानं लिहलं, 'मुंबईत सध्या प्रचंड पाऊस आहे तरिही नाटक बघण्यासाठी ह्या काकू गिरगावाहून विलेपार्ले येथे आल्या. असे मायबाप रसिक नाटकाला येतात, तेव्हा आमची जबाबदारी अधिक वाढते'. यासोबत संदीपने बोरिवली, मुलुंड आणि पुण्यात पार पडणाऱ्या 'वऱ्हाड' नाटकाचा टाईमही चाहत्यांसोबत शेअर केला.
संदीप पाठक सध्या 'इंद्रायणी' मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. . या मालिकेत तो अंताजीच्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'अल्याड पल्याड' या सिनेमात तो दिसला होता. चाहते त्याच्या नव्या सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.