मराठीसह हिंदी सिनेमातही आपल्या अभिनयाने नव्वदचं दशक गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर. त्यांनी आपला अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी विविध भूमिका गाजवल्या. मराठीत 'गंमत- जंमत', 'हमाल दे धमाल', 'लपंडाव', 'भुताचा भाऊ' यांसारख्या मराठी चित्रपटात वर्षा उसगांवकर यांनी साकारलेल्या भूमिका रसिकांना भावल्या. इतकंच नाही तर मराठीतील या यशामुळे वर्षा उसगांवकर यांच्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीची दारं उघडली.
वर्षा उसगांवकर या चांगल्या अभिनेत्री असण्यासोबतच गायिका देखील आहेत. त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले असून प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रवीशंकर शर्मा हे त्यांचे सासरे आहेत. वर्षा यांच्या गायनाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ युनिट बॉक्स या युट्यूब चॅनेलनं शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या एक शास्त्रीय गाणं गाताना दिसत आहेत. आज जानेकी जिद ना करो असे या गाण्याचे बोल आहे. हे गाणं त्यांनी एखाद्या तज्ज्ञ गायकाप्रमाणे गायलं आहे. त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मराठीसह हिंदीतील दिग्गज कलाकारांसह त्या रुपेरी पडद्यावर झळकल्या. 'परवाने', 'तिरंगा', 'हस्ती', 'दूध का कर्ज', 'घर आया मेरा परदेसी' अशा विविध चित्रपटात वर्षा उसगांवकर यांनी भूमिका साकारल्या. एकेकाळी मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये त्यांची गणना केली जात असे. त्यांना आजही प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्यांच्याविषयी जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांना नेहमीच इच्छा असते. छोट्या पडद्यावरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून वर्षा उसगांवकर रसिकांचे भरघोस मनोरंजन करत आहेत.