Join us

"मला या गोष्टींची खंत", वर्षा उसगांवकरांनी व्यक्त केल्या भावना, म्हणाल्या "माझ्यावर अन्याय झाला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 15:27 IST

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये वर्षा उसगांवकर यांनी मनातील भावना व्यक्त केल्या.

Varsha Usgaonkar:  वर्षा उसगांवकर ( Varsha Usgaonkar ) या मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतल्या एक नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. ९० च्या दशकात वर्षा उसगांवकर यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. आपल्या अभिनय व सौंदर्याच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठीबरोबरच बॉलीवूड चित्रपटातही त्यांनी आपली छाप सोडली. वर्षा या शेवटच्या 'बिग बॉस मराठी ५' या शोमध्ये दिसल्या होत्या. तर आता त्यांनी छोट्या पडद्यावरील 'शिवा' मालिका एन्ट्री घेतली आहे. अशातच त्यांची एक मुलाखत चर्चेत आली आहे. 

वर्षा उसगांवकर यांनी फिल्मसिटी मुंबईसाठी घेतलेल्या पॉडकास्टमध्ये चित्रपट कारकिर्दीवर भाष्य केलं.  यावेळी त्यांनी मनातील एक खंत बोलून दाखवली.  वर्षा उसगांवकर म्हणाल्या, "एक पैंजण नावाचा चित्रपट होता,. त्यात मी पुर्णपणे एक पीडित दाखवली होते. त्यात मी ब्राऊन लेन्स वापरल्या होत्या. त्या चित्रपटातील माझी देहबोली आणि अभिनय पटण्यासारखा होता. ती माझ्या व्यक्तीमत्वाला छेद देणारी भुमिका होती. तसेच 'यज्ञ' नावाचा चित्रपट होता. ती एक सूडकथा होती. त्यात नायिका सूड घेताना दाखवलेली आहे. पण, तरीसुद्धा ती माणूस म्हणून कुठेही बदलत नाही. ती अतिशय कणखर भुमिका होती. त्यासाठी मला नॉमिनेशन मिळालं होतं. पण, अर्थात त्यावर्षीचा पुरस्कार मला मिळाला नाही. आतापर्यंत मला 'गंमत जंमत', 'पैज लग्नाची' आणि 'Hu Tu Tu' यासाठी शासनाचे तिन पुरस्कार मिळालेले आहेत. पण, मला असं वाटतं त्या चित्रपटाला पुरस्कार मिळायला पाहिजे होता. त्याच पारितोषिक हुकल्याची मला खंत आहे".

पुढे त्या म्हणाल्या, "हिंदी सिनेमात माझ्यावर अन्याय झाला, असं मी म्हणेन. आता आपण ज्यांना मॅनेजर म्हणतो, त्यावेळी आम्ही त्यांना सेक्रेटरी म्हणायचो. त्यांनी मला मल्टीस्टार चित्रपट करण्याचे सल्ले दिले. ते करायची गरज नव्हती. मी सोलो चित्रपट करायला हवे होते.  मला मल्टीस्टार चित्रपट केल्यानं त्या गर्दीत मी हरवले. मल्टीस्टार केले नसते तर कमी चित्रपट माझ्या नावावर जमा झाले असते. पण, जे जमा झाले असते, ते चांगले चित्रपट झाले असते".  

टॅग्स :वर्षा उसगांवकरसिनेमा