मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी त्यांच्या अभिनय आणि सौंदर्याने एक काळ गाजवला. गेली कित्येक दशकं त्या कलाविश्वात सक्रिय राहून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. वर्षा उसगावकर यांनी मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीतही अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांनी नुकतीच 'लोकमत फिल्मी'च्या 'नो फिल्टर' शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये त्यांनी अनेक किस्से सांगितले.
वर्षा उसगावकर यांनी 'हनिमून' सिनेमात ऋषी कपूर यांच्याबरोबर काम केलं होतं. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य केलं. त्या म्हणाल्या, "ऋषी कपूरबरोबर माझी मैत्री कधी झालीच नाही. हनिमून सिनेमात आमचे खूप रोमँटिक सीन होते. पहिल्या दिवशी सेटवर गेल्यावरच मला तो खडूस वाटला. राज कपूरचा मुलगा असला म्हणून काय झालं मी पण मराठीची स्टार आहे, असं मला वाटायचं. सिनेमाचे दिग्दर्शक मला येऊन म्हणायचे की त्याच्याबरोबर जाऊन बोल. सिनेमात तुमची केमिस्ट्री चांगली दिसली पाहिजे. मी त्यांना म्हणायचे की तुम्ही चिंता करू नका. मी प्रोफेशनल आहे. मी व्यवस्थित सीन्स देईन. त्या सिनेमात अश्विनी भावेही होती. त्याच्याबरोबर तिची गट्टी होती. त्यामुळे अश्विनी याला जवळची वाटते. पण, माझ्याबरोबर हा बोलत नाही. असं म्हणून जवळजवळ ५० टक्के सिनेमाचं शूट होईपर्यंत आम्ही बोललोच नाही. पण, तु्म्ही सिनेमा बघितल्यानंतर हे तुम्हाला जाणवणार नाही."
"एकदा नीतू सिंग पण शूटिंगला आले होते. तेव्हा मराठी कलाकारांच्या हिंदी भाषेबद्दल त्यांचं बोलणं सुरू होतं. तेव्हा ऋषी कपूर नीतू सिंग यांना म्हणाले की वर्षाचं हिंदी खूप चांगलं आहे. त्यांनी मला बोलवलं आणि नीतू सिंग यांची ओळख करून दिली. त्यानंतर मग मला जाणवलं की हा माणूस चांगला आहे. त्याला काळजी आहे. कलेची कदर आहे. खुल्लम खुल्ला नावाचं त्याचं आत्मचरित्र आहे. त्यात त्याने सगळ्या अभिनेत्रींचा उल्लेख केलेला आहे. मला त्यांचा तो मोठेपणा वाटला. मी त्याच्याबरोबर एकच चित्रपट केला आहे. पण, तरीही त्याला माझ्याबद्दल लिहावंसं वाटलं. त्यामुळे मला ऋषी कपूर मला कळला," असंही पुढे त्यांनी सांगितलं.