नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांनी अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. मराठीसह हिंदीतील दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केले आहे. एकेकाळी मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये त्यांची गणना केली जात असे. सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असते' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) मालिकेत माईंच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. त्यांचे आजही प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्यांच्याविषयी जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांना नेहमीच इच्छा असते. वर्षा उसगांवकर यांच्या नवऱ्याबद्दल फार कोणाला माहित नाही. ते लाइमलाइटपासून दूर राहतात.
वर्षा उसगांवकर यांनी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रवीशंकर शर्मा यांचे पुत्र अजय शर्मा यांच्यासोबत लग्न केले आहे. वर्षाचे पती अनेकवेळा त्यांच्यासोबत इव्हेंटमध्ये पाहायला मिळाले आहेत. त्या दोघांच्या लग्नाला जवळपास २० वर्षं झाले आहेत. अजय यांचे कुटुंब संगीत क्षेत्राशी संबंधित आहे तर वर्षा यांचे वडील प्रसिद्ध राजकारणी होते.
अभिनेत्री वर्षा उसगांवकर दिग्गज कलाकार अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि नितीन भारद्वाज यांच्यासोबत अनेक चित्रपटात झळकल्या होत्या.गंमत जंमत, खट्याळ सासू नाठाळ सून, सगळीकडे बोंबाबोंब, मज्जाच मज्जा, हमाल दे धमाल, कुठं कुठं शोधू मी तिला, भुताचा भाऊ, पसंत आहे मुलगी, आमच्या सारखे आम्हीच, शेजारी शेजारी, पटली रे पटली, घनचक्कर, मुंबई ते मॉरिशस, ऐकावं ते नवलच, एक होता विदूषक असे अनेक त्यांचे चित्रपट हिट ठरले आहेत.