Vat Purnima 2024: ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनी वडाची साग्रसंगीत पूजा करतात. त्याला वटसावित्री व्रत असे म्हणतात. वटपौर्णिमेच्या दिवशी हे व्रत केले जाते. एक वटवृक्ष शंभर माणसांना शंभर वर्षे पुरेल एवढा प्राणवायू देतो. अशा ह्या वृक्षाची रोपे सौभाग्यवायन म्हणून आपल्याला शक्य असतील तेवढी द्यावीत, असे सांगितले जाते. यंदा शुक्रवारी(२१ जून) वटपौर्णिमा साजरी केली जात आहे. अनेक सेलिब्रिटीही दरवर्षी मोठ्या उत्साहात वटपौर्णिमा साजरी करतात.
महाराष्ट्राची लाडकी वहिनी आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख हिनेही मोठ्या उत्साहात वटपौर्णिमा साजरी केली. जिनिलीयाने घरातच वडाच्या फांदीची पारंपरिक पद्धतीने पूजा केली. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. या व्हिडिओत जिनिलीया वडाच्या फांदीभोवती सात फेरे घेताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत जिनिलीयाने रितेशसाठी खास पोस्ट लिहिली आहे. "माझ्या लाडक्या नवरोबा, तुमच्याशिवाय एकही दिवस घालवू शकत नाही. तुम्हाला माझं आयुष्यही लाभो" असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे.
रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी आहेत. त्यांच्याकडे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल म्हणून पाहिलं जातं. रितेश आणि जिनिलीयाने २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुलं आहेत. दोघेही सोशल मीडियावरुन एकमेकांप्रतीचं प्रेम व्यक्त करताना दिसतात.