Join us  

Ved Marathi Movie : लय भारी ! मराठमोळं 'वेड' वाढतंच चाललंय, गाठला 50 कोटींचा टप्पा, रितेश म्हणाला, 'शब्द...'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 1:28 PM

सध्या सर्वत्र चर्चा आहे ती फक्त आणि फक्त वेड सिनेमाची. रितेश देशमुख आणि जिनिलिया या लाडक्या जोडीच्या 'वेड' या सिनेमाने आता ५० कोटींची कमाई केली आहे.

Ved Marathi Movie :  मराठी सिनेसृष्टीत सध्या एका चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. धुमाकळच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला 'वेड' लावले आहे. सध्या सर्वत्र चर्चा आहे ती फक्त आणि फक्त वेड सिनेमाची. रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया (Genelia) या क्युट जोडीच्या 'वेड' या सिनेमाने आता ५० कोटींची कमाई केली आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून दोघांवरही कौतुकाचा वर्षाव होतोय. 

'वेड' सिनेमा ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि अक्षरश: सिनेमाने बॉक्सऑफिसवर आकड्यांचा थरच रचायला सुरुवात केली. सोमवारच्या दिवशीही वेड ने 1 कोटीची कमाई केली. फक्त २० दिवसात सिनेमाने 50 कोटींचा गल्ला जमवला आहे.पहिल्या आठवड्यात सिनेमाने 20.18 कोटी तर दुसऱ्या आठवड्यात 20.67 कोटींची कमाई केली. 'सैराट' नंतर सर्वात जास्त कमाई करणारा 'वेड' हा दुसरा मराठी चित्रपट ठरला आहे. हा टप्पा गाठल्यानंतर  रितेश देशमुखने भावूक पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

रितेश लिहितो, 'शब्द अपुरे पडत आहेत!!! वेड चिरत्रपटाला मोठ्या मनाने आपण स्वीकारले आणि भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुम्हा प्रेक्षकांचे कोटी कोटी आभार!'

 रितेशच्या या पोस्टवर अभिनेत्री सई ताम्हणकर हिने 'कडक' अशी कमेंट केली आहे. 

Ved Marath Movie : वेड, वाळवी, व्हिक्टोरिया... फक्त 99 रुपयात पाहा 'हे' मराठी सिनेमे; पण कधी?

'वेड' सिनेमा एका दिवसात ७ कोटींची कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट ठरला होता. हा विक्रम करत वेडने सैराटचाही रेकॉर्ड मोडला होता. वेड सिनेमा २० दिवसांनंतर अजुनही तुफान गाजतोय.तसेच आज कोणताही सिनेमा केवळ ९९ रुपयांमध्ये पाहता येणार असल्याने आजही सिनेमाची बक्कळ कमाई होण्याची शक्यता आहे. 

'वेड' चे यश पाहता लोकांच्या आग्रहास्तव सिनेमात एक नवे गाणेही सामील करण्यात आल्याची माहिती रितेशने नुकतीच दिली आहे. सत्या आणि श्रावणीचं एकही रोमॅंटिक गाणं नाही असं अनेक जण म्हणाले. मग काय रितेशने लगेच चाहत्यांना खूश करत नवं गाणं आणलं आहे. 'वेड तुझा' हे गाणं नवीन रुपात २० जानेवारीपासून प्रेक्षकांना थिएटरमध्येही बघता येणार आहे. चाहत्यांना गाण्याची प्रचंड उत्सुकता आहे. 

टॅग्स :वेड चित्रपटरितेश देशमुखजेनेलिया डिसूजा