Riteish Deshmukh Genelia Deshmukh Exclusive Interview: महाराष्ट्राच्या लाडक्या दादा-वहिनींचा एक वेड लावणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. होय, आम्ही बोलतोय ते रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख या जोडीच्या आगामी ‘वेड’ (Ved marathi Movie )या मराठी सिनेमाबद्दल. नुकताच ‘वेड’चा ट्रेलर लॉन्च झाला. या ट्रेलरनं प्रेक्षकांना वेड लावलं आहे आणि आता हा सिनेमा वेड लावण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने जिनिलीया व रितेश यांनी ‘लोकमत फिल्मी’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्याचाच हा सारांश...
कुठे सुरू झाला ‘वेड’चा प्रवास...सिनेमाचं वेड पहिल्यापासूनच होतं. म्हणून आम्ही 20 वर्षांपासून काम करतोय. पण दिग्दर्शनाचा निर्णय मी लॉकडाऊनमध्ये घेतला. खरं तर 7-8 वर्षांपूर्वीच मी हे करायचं होतं. पण कुठल्या ना कुठल्या चित्रपटात मी बिझी होतो. लॉकडाऊनमध्ये सगळं स्थिर झालं, थांबलं, त्यावेळी जिनिलीयानं मला प्रेरणा दिली. मी दिग्दर्शन करावं, ही तिची इच्छा होती. ‘वेड’ची सुरूवात ही लॉकडाऊनमध्ये झाली. 7 डिसेंबर 2021 रोजी ‘वेड’चं पहिलं शूटींग सुरू झालंय आणि आज वर्षभरानंतर सिनेमा रिलीज होतोय, असं रितेश म्हणाला.
प्रेम असताना ते नाहीये, हे किती कठीण होतं...जिनिलीया व रितेश एकमेकांवर किती प्रेम करतात, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण ‘वेड’ या सिनेमात जिनिलीयाने साकारलेली श्रावणी आणि रितेशनं साकारलेला सत्या यांचं नातं जरा वेगळं आहे. श्रावणी सत्यावर नितांत प्रेम करते. पण सत्या तिच्याकडे पाहायलाही तयार नसतो. रिअल लाईफमध्ये एकमेकांवर इतकं प्रेम असताना सिनेमात ते नाहीये, हे दाखवणं किती कठीण आहे, असा प्रश्न रितेश व जिनिलीयाला करण्यात आला. यावर रितेश म्हणाला, ‘सिनेमात श्रावणी आणि सत्या एकमेकांच्या अगदी अपोझिट आहे. श्रावणी त्याच्या प्रेमात आहे आणि सत्या तिच्याकडे पाहायला तयार नाही. याआधी आम्ही दोघांनी अशा भूमिका साकारल्या नव्हत्या. या निमित्ताने काहीतरी वेगळं करायला मिळेल, असं आम्हाला वाटलं. ’
आम्ही आमच्या कामाचा आदर करतो....जिनिलीया ‘वेड’ची निर्माती आहे तर रितेश देशमुखने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. सेटवर या दोघांचं ट्युनिंग कसं होतं? जिनिलीया यावर बोलली. ती म्हणाली,‘ मी घरात होम मिनिस्टर आणि सेटवर निर्माती असले तरी आम्ही दोघं एकमेकाच्या कामाचा प्रचंड आदर करतो. मी कधी रितेशच्या कामात हस्तक्षेप करत नाही. रितेशचा सुद्धा निर्माती म्हणून माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. नवरा बायकोचं नातं असो किंवा निर्माती-दिग्दर्शक म्हणून नातं असो यात आदर असेल तर सगळं सोप्प होतं.’
श्रावणी-सत्या साकारताना काही नवं गवसलं?श्रावणी आणि सत्या या दोन्ही भूमिका साकारताना नक्कीच खूप काही गवसलं. सत्या बायकोच्या पैशावर जगत असतो. तो बायकोकडे बघणंही पसंत करत नाही. त्याला व्यसन असतं. पण अशातही श्रावणी त्याला भक्कम साथ देते. ती त्याला काळोखातून बाहेर काढायला हात देते...अशी एक व्यक्ती आयुष्यात असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. खºया आयुष्यात मी सत्यासारखा नाही. पण जिनिलीया मात्र श्रावणीसारखी आहे, असं रितेश म्हणाला.
जिनिलीयात एक चांगली गोष्ट म्हणजे कमिटमेंट आहे. मित्रांप्रती, तिच्या कुटुंबीयांप्रती, कामाप्रती...पण आई म्हणून तिची जी कमिटमेंट आहे ना, ती वेगळीच आहे. ती एक नवीनच जिनिलीया आहे आणि त्या जिनिलीयाचा मला अभिमान आहे, असं रितेश म्हणाला. साडी, डोळ्यात काजळ आणि ओले केस अशी जिनिलीया मला आजही वेड लावते, असंही रितेश म्हणाला.