Join us

Ved Movie : 'वेड'च्या यशाने भारावला रितेश देशमुख; म्हणाला - 'हा चित्रपट चालला नसता तर…'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 7:30 PM

Ved Marathi Movie : ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या वेड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५५ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिग्दर्शित आणि अभिनीत वेड (Ved Marathi Movie) चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. यामुळे अभिनेता चर्चेत आहे. नुकतेच त्याने त्याच्या वेड या पहिल्या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील अनपेक्षित यशावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले. तसेच चित्रपटाच्या निर्मितीबद्दलही त्याने भाष्य केले. ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या वेड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५५ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, वेड चित्रपट बनवत असतानात्याला आणि त्याची पत्नी, सहकलाकार जिनिलिया देशमुख यांना आलेल्या अनेक अडचणींबद्दलही रितेशने सांगितले आहे. जेव्हा कोणत्याच स्टुडिओने त्यांच्याबरोबर चित्रपटात भागीदारी करण्यास होकार दिला नव्हता, तेव्हा त्यांना स्वबळावर चित्रपट रिलीज करावा लागल्याचे रितेशने सांगितले. त्यासाठी प्रमोशनची रणनीती तयार करण्याची जबाबदारी जिनिलियाने घेतली होती.

रितेश देशमुख म्हणाला, या आकड्यांची आम्ही कल्पनाच केली नव्हती. सैराट हा एकमेव मराठी चित्रपट होता, ज्याने ५० कोटींहून जास्त कमाई केली होती. आम्ही त्या झोनमध्ये येऊ असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. जेव्हा तुम्ही मोठ्या स्टारकास्टसह हिंदी चित्रपट बनवता, तेव्हा तुमची रिकव्हरी कुठे आहे, हे तुम्हाला आधीच माहित असते. पण मराठी चित्रपटांच्या बाबतीत याचा अंदाज बांधणेही खूप कठीण आहे.

 

तो पुढे म्हणाला की, जेव्हा आम्ही चित्रपट बनवायला सुरुवात केली, तेव्हा आमच्याकडे बोर्डवर स्टुडिओ नव्हता. पण, आम्हाला आशा होती की आम्ही एका विशिष्ट स्केलचा, विशिष्ट व्हिज्युअल अपीलचा चित्रपट बनवत असल्यामुळे तो प्रेक्षकांना आकर्षित करेल. कारण त्यात अजय-अतुलचे उत्तम संगीत, तरुणांना व कौटुंबिक प्रेक्षकांना आकर्षित करू शकेल अशी संवेदनशीलता आहे, याची आम्हाला खात्री होती. खरं तर या चित्रपटातील एक गाणं केल्याबद्दल मी सलमान खानचा खूप आभारी आहे. त्याने आमच्या चित्रपटात खूप मोलाची भर घातली. या सर्व गोष्टी असूनही आम्हाला बोर्डवर स्टुडिओ मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला.

स्टुडिओ न मिळाल्यामुळे आमच्यावर दडपण आले होते. त्यामुळे आम्हाला चित्रपट स्वबळावर प्रदर्शित करावा लागला. परिणामी, सर्व काही बॉक्स ऑफिसवर अवलंबून होते. जर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नसता, तर जिनिलिया आणि माझ्यासाठी केवळ आर्थिकच नाही तर मोठा धक्का असता. पण, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली, असे रितेशने सांगितले.
टॅग्स :वेड चित्रपटरितेश देशमुखजेनेलिया डिसूजा