व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा मराठी सिनेमाचा डंका पाहायला मिळाला. एक नाही तर दोन पुरस्कार मिळवत आंतराराष्ट्रीय पुरस्कारांतही मराठी सिनेमाने बाजी मारली आहे. दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे 'द डिसायपल’ या चित्रपटाला ‘इंटरनॅशनल क्रिटिक्स’ आणि सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार जिंकणारा 'द डिसायपल' 30 वर्षांतील पहिला सिनेमा बनला आहे. याशिवाय या सिनेमाने कान्स आणि बर्लिन चित्रपट महोत्सवातही आपली छाप सोडली आहे.
व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेल्या गौरवामुळे चैतन्य ताम्हणेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या सिनेमाने जवळपास 19 वर्षांनी व्हेनिस फिल्म फेस्टीव्हलमध्ये भारतीय सिनेमाचं नाव पोहोचवलं आहे. या आधी ‘मान्सून वेडिंग’ या मीरा नायर यांनी दिग्दर्शित चित्रपटाला व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन लायन पुरस्कार मिळाला होता. जगातील सर्वात महत्त्वाच्या तीन फिल्म फेस्टीव्हलमध्ये व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलची गणना होते. 'द डिसायपल' शास्त्रीय संगीतातल्या जगतावर आधारित हा सिनेमा आहे. आदित्य मोडक, सुमित्रा भावे, अरुण द्रविड़ आणि किरण यज्ञोपवीत यांनी या सिनेमात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
चैतन्य ताम्हाणेवर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. खुद्द आयुषमान खुराणानेही चैतन्यचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चैतन्यने आपल्या कामगिरीतून सा-या भारतीयांची मान अभिमानने उंचावली असल्याचे म्हणत आपला आनंद व्यक्त केला आहे. खरंतर ‘कोर्ट’ या आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमातूनच चैतन्य ताम्हाणेने चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे कोर्ट सिनेमाची भारताकडून ऑस्करसाठी अधिकृत निवड करण्यात आली होती.
हा सिनेमा रसिकांसह समीक्षकांनाही भावला होता. त्यामुळंच की काय या सिनेमाने विविध अन्य पुरस्कार सोहळ्यातही बाजी मारली होती. आज चैतन्य मराठी चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव आहे. 'द डिसायपल’ चित्रपटाला व्हेनिस फिल्म फेस्टीव्हलमध्ये झालेल्या गौरवामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता जगभरातील प्रेक्षकांच्या मनात ताणली गेली आहे. इतकेच नाही तर दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे, पुढे कोणता चित्रपट करणार याकडे सर्वांचंच लक्ष असणार हे मात्र नक्की.